Just another WordPress site

Crop damage due to heavy rains : बळीराजा संकटात! मुसळधार पावसामुळे मुंगळा परिसरात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल, नुकसान भरपाईची मागणी

मुंगळा (वेब टीम, मुंबई) : शेती व्यवसाय हा मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. मात्र, हाच पाऊस यंदा नुकसानीलाही कारणीभूत ठरतोय. जून महिन्यात मालेगाव तालुक्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगलंच कमबॅक केलं. मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मेडशी, डोंगरिकन्ही यासह अनेक गावात एका आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पिकांना चांगलाच फटका बसला.

मालेगाव तालुक्यातील बहुतांश भागांत अतिवृष्टी झाल्यानं नदीनाल्याकाठी असलेल्या शेतामध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली. जुलै महिन्यातील मुसळधार पावसानंतर पावसाने काही दिवस दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा पावसाने संबंध राज्यासह मालेगाव तालुक्यात हजेरी लावली. आतापर्यंत राज्यात मुसळधार पाऊस बरसला असला तरी मालेगाव तालुक्यातील सरासरी एवढा पाऊस झाल्याने पिके जोमात होती. शिवाय वातावरणही पोषक होते. राज्यात पावसाने उसंत घेतली असताना मात्र, दोन दिवसात अशी काय पावसाने हजेरी लावली की सर्व पिके पाण्यात गेलीत. तालुक्यातील मुंगळा परिसरात मुसळधार पावसामुळे शेती पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही खरीप पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे पिके पिवळी पडत चालली.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, या जोरदार पावसाने मुंगळा येथील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे चांगलेच नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला. मुसळधार पावसामुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे, शिवाय, शेत जमिनही खरडून गेल्याचे प्रकार तालुक्यातील अनेक गावात घडले. शेतात साचलेल्या पावसामुळं शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढलं.  तर काही ठिकाणी बियाणे किड्यांनी फस्त केलंय. त्यामुळे खरीप पिकांकडून शेतकऱ्यांना असलेल्या आशा आता संपल्यात जमा आहेत. पावसाची संततधार आणि शेत जमिनीत वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी, पाण्याचा निचरा करणं, निंदन, डवरे यासारखी कामे करता येत नाहीत. डवरणी करायला गेल्यावर शेतात बैल फसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं एकीकडे नैसर्गिक संकटामुळं शेतकऱ्यांची अडचण झाली असून शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढू लागली. गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने शेतशिवराचे चित्रच बदलून गेलेय. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होत असतानाही शेतकरी हताश आहे. अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण हंगामच हातातून जाण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. दरम्यान, शेतामध्ये पाणी साठून शेतपिकांचे नुकसान होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं महसूल आणि कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी माणिक बोबडे यांच्यासह अनेकांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!