Just another WordPress site

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं संभाजी भिडे यांचं कौतूक

सांगली : एकामागून एक वादग्रस्त वक्तव्ये करुन प्रसिद्धीच्या झोतात राहणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. बावनकुळे संघटनात्मक दौऱ्यासाठी सांगलीला आले होते. त्यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांची भेट घेत त्यांची आपुलकीने विचारपूस केली, निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. भिडे यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी भिडेंचं कौतुक केलं, गुरुजी फार विनम्र आहे म्हणत त्यांची प्रशंसा केली.

माझ्या बागेतील आंबा खाऊन अनेकांना मुलं झालं इथपासून ते ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, अशी वादग्रस्त वक्तव्ये करुन संभाजी भिडे सातत्याने प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. गेल्या १५ दिवसांपूर्वीच एका महिला पत्रकारला टिकली लावून ये-मगच तुझ्याशी बोलेन, अशी सूचना करुन त्यांनी महाराष्ट्राचा रोष ओढावून घेतला. या साऱ्या प्रकारावरुन त्यांच्यावर चौफेर टीका झाली. अशी सगळी पार्श्वभूमी असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भिडे यांची भेट घेतली.

चंद्रशेखर बावनकुळे आज संघटनेच्या कामासाठी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. संघटनेचं काम आटपून सायंकाळी पाच वाजता त्यांनी संभाजी भिडे यांच्या ‘दत्त निवास’ येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यापूर्वी भिडे यांनी बावनकुळे यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. दोघांनीही अनेक विषयांवर हितगुज केलं.

भेटीनंतर बावनकुळे यांनी संभाजी भिडे यांच्या साधेपणासह त्यांच्या विनम्रतेची प्रशंसा केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन हे मोलाचे असल्याचे मत व्यक्त करीत ही भेट अविस्मरणीय असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पृथ्वीराजबाबा देशमुख, शहराध्यक्ष दीपकबाबा शिंदे , प्रदेश सदस्य शेखर इनामदार, निताताई केळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!