Just another WordPress site

मुलीचा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांनी लिहिली भावुक फेसबुक पोस्ट, लिहिलं, “प्रिय कब्बु,…”

मुंबई : आंबेडकरी विचारांची धगधगती मशाल ते उद्धव ठाकरेंच्या बहुजनवादी हिंदुत्वाच्या प्रचारक बनलेल्या, गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या वक्तृत्वाने शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या सुस्साट सुटलेल्या गाडीला ब्रेक लावण्यासाठी त्यांचे पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारे यांनाच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात खेचून शिंदे गटाने मोठा डाव टाकला. खरं तर आपल्यापासून विभक्त झालेल्या माणसावर बोलणं किंवा त्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं नसताना सुषमा अंधारेंना पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागलं. बाबासाहेबांच्या कायद्याचा दाखला देत प्रत्येक व्यक्तीला आपले निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत वैजनाथ वाघमारे यांच्या पुढील प्रवासासाठी सुषमा अंधारेंनी शुभेच्छा दिल्या. परंतु एकेकाळी आपल्या साथीदार असलेल्या व्यक्तीने ‘लवकरच पर्दाफाश करु’, अशी धमकी दिल्याने सुषमा अंधारे यांच्या मनाला तीच गोष्ट लागली. वाघमारे यांच्या बाकीच्या आरोपांना सुषमा अंधारेंनी संयमी उत्तरं तर दिली… पण आज सायंकाळी भावुक फेसबुक पोस्ट करुन आपल्या ५ वर्षांच्या लेकीलाही आश्वस्त केलं.

राजकारण म्हटलं की वाद आले…. प्रतिवाद आले… टीकाटिप्पणी आली… पण तेच राजकारण जेव्हा कौटुंबिक पातळीवर येऊन पोहोचतं तेव्हा त्याची धग जास्त जाणवते. सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी आज सकाळी अंधारे यांच्यावर टिप्पणी करताना त्यांचा लवकरच पर्दाफाश करु, असा इशारा दिला. तसेच पोटच्या मुलीला कधी आपल्या छातीचं दूध पाजलं नाही पण संजय राऊतांसाठी डोळ्यात अश्रू आले… असं म्हणत वाघमारेंनी अंधारेंवर टीका केली. या सगळ्या टीका-टिप्पणीनंतर अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका तर मांडलीच… पण आपल्या वादात लेकीलाही ओढल्याची खंत मनात ठेऊन रविवारी सायंकाळी त्यांनी एक इमोशनल फेसबुक पोस्ट लिहिली. तसेच भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत, असं सांगताना आपण रडणारी नसून लढणारी असल्याचं सांगत त्यांनी पुढील संघर्षाला तयार असल्याचंच सांगितलं.

सुषमा अंधारे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात..

प्रिय कब्बु,

“तू फक्त ४५ दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!”

तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात, बाबासाहेब लिहितात, “जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत, त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील.. भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा”

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!