Just another WordPress site

सावधान! गल्लीबोळात फटाके फोडायला सुरुवात, दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

गेल्या काही दशकांमध्ये दिवाळी आणि फटाके यांचे एकमेकांशी घट्ट नातं आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये तो आवाजाचा सणदेखील होत आहे. आवाज करणारे आणि रोषणाई करणारे असे दोन प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध असतात. या दोन्ही प्रकारच्या फटाक्यांपासून धूर तयार होतो. हा धूर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळेच फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. फटाक्यापासून निर्माण होणाऱ्या धुरामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, डोळे जळजळणे यासारख्या अनेक समस्यांना फटाक्यांच्या धुरामुळे आमंत्रण मिळते. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या धुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे.

 

मास्क लावून पडा बाहेर

घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, हा फटाक्यांच्या धुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग आहे. दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. आतापासूनच मास्क वापरायला सुरुवात करा आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करा. पावसाळा संपल्यानंतर अचानक हवेमध्ये धुळीचे प्रमाणही वाढत असतं. मास्कमुळे त्यापासूनदेखील संरक्षण होण्याची हमी असते.

 

खिडकी दरवाजे करा बंद

फटाक्यांची आतषबाजी सुरू असण्याच्या काळात अनेकांना त्रास होतो. विशेषतः श्वासांशी संबंधित समस्या असणाऱ्या नागरिकांनी या काळात घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे घराचे खिडकी आणि दरवाजे बंद ठेवल्यामुळे धुरापासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते.

 

चष्मा वापरा

फटाक्यांचा धूर सर्वाधिक नुकसान डोळ्यांचे करतो. त्यामुळे घराबाहेर पडताना चष्मा वापरण्याचा सल्ला दिला जातो. फटाक्यांचा धूर डोळ्यात गेल्यामुळे डोळे जळजळणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना खाज सुटणे, इन्फेक्शन होणे यासारख्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना नियमितपणे चष्म्याचा वापर करावा.

 

गर्भवती महिलांची काळजी

फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर आणि आवाज याचा गर्भवती महिलांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता असते. फटाक्यांमध्ये असणाऱ्या हानिकारक रसायनामुळे बाळाच्या शरीरातील टॉक्सिनचे प्रमाण वाढते. बाळाच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे गर्भपात होण्याची शक्यतादेखील बळावते.

 

हृदयविकाराचे रुग्ण

जर तुम्हाला हृदयासंबंधित काही विकार असेल, तर दिवाळीच्या काळात घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. फटाक्यांमध्ये असणारे लेड आरोग्यासाठी हानिकारक करण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होऊन हृदयाचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

 

Disclaimer: फटाक्याच्या धूर आणि आवाजापासून घेण्याच्या काळजीबाबत या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!