Just another WordPress site

लाखांदुरात ३१ लाख ६५ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त, चौघांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

लाखांदूर : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील किराणा दुकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (Aromatic tobacco) व गुटखा विक्रीची प्रमुख केंद्रे बनली असून, आता अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (२७ जून) येथे अवैध सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणारा एक मिनी ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमधून ३१ लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. (Aromatic tobacco worth Rs 31 lakh 65 thousand seized in Lakhandur, case registered against four, local crime branch action)

शहरातील ठोक किराणा व्यावसायिकासह अन्य तीन आरोपींविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लाखांदूर तालुक्यातील अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गस्तीवर असताना त्यांना छत्तीसगड राज्यातून लाखांदुरात अवैध सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणारा मिनी ट्रक अर्जुनी मोरगाव मार्गावरील चिचगाव फाट्याजवळ आढळून आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना संशय येताच त्यांनी एमएच ३६ एए ०५५४ क्रमांकाचा मिनी ट्रक पकडून तपास केला. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री, वाहतूक करण्यास मनाई असताना त्याचे उल्लंघन करून तंबाखूजन्य सुगंधित पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना दिसून आला.

अन्न-औषधी प्रशासन विभाग भंडाराचे अन्न सुरक्षा अधिकारी शीतल देशपांडे यांच्या तक्रारीवरून चार आरोपींविरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये येथील ठोक किराणा व्यावसायिक मोहनलाल केवळराम नागवानी (६२), आशिष सदाराम माकडे (३१), शंतनू सुरेश प्रधान ( तिन्ही रा. लाखांदूर) तर छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील संकेत रिचा (४२) यांचा समावेश आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यावेळी कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीश कोकाटे यांनी लाखांदुरातील तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरातील काही किराणा व्यावसायिक होलसेल किराणा मालाची विक्री करीत असून दररोज तालुक्यासह भंडारा, गोंदिया जिल्ह्यात किराणा मालासोबतच प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. मात्र, पोलीस विभागासह अन्न सुरक्षा व औष प्रशासन विभागाचे अधिकारी हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. सोमवारी केलेली कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा असली तरी मोठी कारवाई झाल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!