Just another WordPress site

देशात नवरात्रौत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचं कौतुक; पण आजवर ‘ही’ महत्वाची पदं महिलांनी भूषवली नाही

सध्या देशात नवरात्रौत्सव  सुरू आहे. त्यानिमित्तानं स्त्रीशक्तीचं कौतुकही होतांना दिसतं. आजच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा मोठा वाटा आहे. पण एवढं पुरेसं नाही. आजही अनेक महत्वांच्या पदांवर महिलांची वर्णी लागली नाही. तिथं केवळ पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. जाणून घेऊया अशी कोणती पदं आहेत, जी महिलांनी अद्याप भूषवली नाहीत.

 

सरन्यायाधीश

भारतात १९५० मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं. आजवर अनेक प्रभावी कायदेतज्ज्ञ वकील आणि न्यायाधीश या महिला झालेल्या देशानं पाहिल्या. सर्वोच्य न्यायालयाच्या स्थापनेनंतर १९८९ मध्ये फातिमा बिवी या सर्वोच्च न्यायालयातल्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या. आज सध्या सर्वोच्च न्यायालयात चार महिला न्यायाधीश आहेत.  पण आजवर कोणीही महिला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश होऊ शकलेल्या नाहीत.

 

मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई हे देशातलं प्रागतिक शहर मानलं जातं. या शहराचा गाडा हाकणाऱ्या दोन महत्त्वाची पदांवर आजपर्यंत एकाही महिलेची वर्णी लागली नाही. ती पदं म्हणजे मुंबई महापालिकेचं आयुक्तपद आणि मुंबई शहराचं पोलिस आयुक्तपद. अनेक महिला अधिकारी कामानं आणि ज्येष्ठतेनं तिथपर्यंत पोहोचल्या, पण पदाला गवसणी घालू शकल्या नाहीत.

 

राज्याच्या मुख्य सचिव

मुंबई महापालिका आयुक्तांसोबतच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदीही आजपर्यंत कधीही महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

 

सीबीआय, आयबी आणि रॉ प्रमुख

सीबीआय, आयबी आणि रॉ या तीनही संस्था देशाच्या तपास आणि गुप्तचर यंत्रणा आहेत आणि म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेतही महत्वाची भूमिका बजावतात. अनेक राज्यांच्या केडरमधून पोलिस अधिकारी सीबीआय मध्येही सेवा बजावतात. पण आजपर्यंत सीबीआयच्या संचालक पदापर्यंत  एकाही महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.  तर आयबी आणि रॉ या संस्था देशासोबतच देशाबाहेरही महत्वाचं काम करतात.  पण त्यांच्या स्थापनेपासून आजवर या संस्थाच्या प्रमुखही महिला अधिकारी झाल्या नाही आहेत.

 

इस्रो प्रमुख

‘इस्रो’  अंतराळ संशोधनाचं महत्त्वाचं स्थान आहे.  ‘इस्रो’च्या या प्रवासात महिला वैज्ञानिकांचं योगदान मोठं राहिलं. पण इस्रोच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकही महिला ही ‘इस्रो’च्या प्रमुखपदावर म्हणजे अध्यक्ष झाली नाही आहे.

 

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर

‘रिझर्व्ह बँक’चे स्थापना १९३५  मध्ये झाली. तेव्हापासून आजवर वीसहून अधिक पुरुषांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपद भूषवले. मात्र, अद्याप एकाही महिलेनं रिझर्व्हे बॅंकेचे गव्हनर्रपद भूषवले नाही.

 

खरंतर आ. ह. साळुंखे म्हणतात तसं, स्त्रियांची प्रतिभा आणि कार्यक्षमता जितकी फुलेल, तितके मानवजातीचेच कल्याण होईल. कारण, निम्मी मानवजात स्त्रियांनी बनलेली आहे. त्यांची कार्यक्षमता मारून टाकणे याचा अर्थ केवळ स्त्रियांची हानी करणे असा नसून एकूण मानवजातीचीच ५० टक्के कार्यक्षमता मारून टाकणे होय. स्त्रियांना केवळ अपत्य निर्मिती पुरतीच मर्यादित न ठेवता जीवनाच्या विविध क्षेत्रात तिला कर्तृत्वाची उंच शिखरे गाठण्याची संधी देणे, हे एकूण मानवजातीच्या दृष्टीने अत्यंत हिताचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!