Just another WordPress site

‘सपा’च्या अध्यक्षपदी अखिलेश यांची फेरनिवड, अखिलेश यादव समाजवादी पक्षाला नवसंजीवनी देतील का?

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची गुरूवारी समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. ते तिसऱ्यांदा सपाची धुरा सांभाळतील. फेरनिवडीमुळे त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ लाभेल. सपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

 

महत्वाच्या बाबी

१. अखिलेश तिसऱ्यांदा बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
२. मुलायमसिंह यांनी केली १९९२ मध्ये सपाची स्थापना
३. आगामी निवडणूकीत सत्ता मिळवणं हे सपासाठी आव्हान
४. आदित्यनाथ यांचं प्राबल्य वाढल्यानं सपाची पिछेहाट

 

अखिलेश यादव यांच्या आधी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. जनता दलाची विविध शकले झाली आणि त्यातूनच मुलायम सिंह यादव यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद यादव कुटुंबाकडेच आहे. मुलायमसिंह यादव यांनी पक्षाच्या स्थापनेपासून २०१७ पर्यंत म्हणजे जवळपास २५ वर्षे पक्षाचे अध्यक्षपद एकहाती सांभाळले. त्यांनतर मुलायमसिंह यादव यांच्या जागी अखिलेश यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. पुढं ऑक्टोबर २०१७ मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र, अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली २०१७ आणि २०२२च्या विधानसभा तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाची पीछेहाटच झाली. यामुळेच आता अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर समाजवादी पक्षाला उभारी देण्याचे मोठे आव्हान आता अखिलेश यांच्यासमोर असेल. त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानं ते २०२४ मधील लोकसभा निवडणूक आणि २०२७ मधील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करू शकतील.
आजवर समाजवादी पक्षाला यादव आणि मुस्लिम या समीकरणाने साथ दिली. मात्र, त्याच वेळी अन्य समाज सपाच्या विरोधात गेले. मुस्लिमांचा पाठिंबा मिळत गेल्याने हिंदू मतांवर परिणाम झाला. केवळ यादव आणि मुस्लिमांचा पक्ष ही प्रतिमा बदलण्याचं अखिलेश यांचे प्रयत्न आहेत. पण पक्षावर बसलेला शिक्का पुसला गेलेला नाही. लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपने समाजवादी पक्षाचा पराभव केला. त्यामुळं आगामी निवडणूकीत सत्ता मिळवणं हे सपासाठी मोठं आव्हान आहे.
दुसरं म्हणजे, समाजवादी पक्षाला सध्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे. सपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाने उत्तरप्रदेशात चांगली कामगिरी केली. पण, तो पक्ष भाजपला सत्तेपासून रोखू शकला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं प्राबल्य वाढल्यानं समाजवादी पक्षांची आगामी निवडणूकीत मोटी कसोटी लागणार आहे. कारण, योगी आदित्यनाथ हे यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं भाजपला रोखण्याकरिता समाजवादी पक्षाने या युपीत कमालीचे प्रयत्न करावे लागणार आहे. भाजप स्थानिक राजकीय पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं आगामी निवडणूका ह्या समाजवादी पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणुकांचा हंगाम असेल तरच अखिलेश सक्रिय असतात, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवावा लागणार आहे.
उत्तर प्रदेश हे राज्यातील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र देखील आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांची मते आपल्याकडे वळवणं हे देखील अखिलेश यांच्यासमोर मोठं आवाहन आहे.
वयाच्या पन्नाशीत असलेल्या अखिलेश यांच्यासमोर मोठी राजकीय कारकीर्द आहे. आगामाी निवडणुकीत सत्ता मिळवून आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी आता अखिलेश यादव यांची यंत्रणा काय करिष्मा दाखवते, हेच पाहण महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!