Just another WordPress site

अभिनेत्री बिनोदिनी दासी यांच्यावर येणार सिनेमा, कंगना साकारणार भूमिका, कोण होत्या बिनोदिनी दासी?

कंगना रनौतनं नुकतीच एक घोषणा केली आहे की ती एका नवीन बायोपिकमध्ये काम करत आहे, ज्यात ती एका बंगालमधील प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री बिनोदिनी दासी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. कंगनाच्या या घोषणेनंतर सगळ्यांनाच आता नाट्य अभिनेत्री बिनोदिनी यांच्याविषयी जाणून घ्यायचे आहे.

अभिनेत्री बिनोदिनी यांचा जन्म कोलकाता येथील वेश्या समाजात झाला. बिनोदिनी यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात वयाच्या १२ व्या वर्षीच केली होती आणि २३ व्या वर्षी त्यांनी अभिनय करणं सोडून दिलं. त्या खूपच गरीब कुटुंबातून आल्या होत्या. आणि बोललं जातं की त्या स्वतः देखील वेश्या व्यवसायाचा भाग होत्या. इतकंच नाही तर बिनोदिनी यांच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वतःला देखील वेश्या म्हणून संबोधलं होतं. त्यांचे लग्न वयाच्या ५ व्या वर्षीच झाले होते. पण काही वर्षांनी त्यांच्या पतीसोबत त्यांनी काहीच संबंध ठेवले नव्हते.

बिनोदिनी दासी यांनी ग्रेट नॅशनल थिएटरमधनं द्रौपदीच्या छोट्या भूमिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यांनी बंगाली थिएटरमध्ये खूप काम केलं होतं. त्यानंतर बिनोदिनी दासी प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य लेखक गिरी चंद्र घोष यांच्याकडून अभिनय शिकल्या आणि १८८३ मध्ये त्या दोघांनी मिळून स्टार थिएटरची सुरुवात केली.

एक उत्तम अभिनेत्री असूनही बिनोदिनी यांना समाजाकडून अनेकदा हेटाळणीच पदरात पडली. बिनोदिंनी यांना लिखाणाची खूप आवड होती,त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र ‘अमर कथा’ देखील लिहिलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी कविता आणि अनेक कथा लिहिल्या आहेत. बोललं जातं की बिनोदिनी दासी यांना त्यांच्या आयुष्यात अनेकदा फसवलं गेलं आणि त्यानंतरच त्यांनी नाट्यक्षेत्राकडे पाठ फिरवली. त्यांना एक मुलगी देखील होती,पण वयाच्या १२ व्या वर्षी तिचं निधन झालं. तर बिनोदिनी दासी यांनी वयाच्या ४१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता अशा बिनोदिनी दासी यांच्या बोयोपिकमध्ये लवकरच कंगना दिसणार असल्यानं तिचे चाहते मात्र भलतेच उत्सुक आहेत याविषयी.

कंगना सध्या बायोपिकच्या प्रेमात आहे असं वाटतंय. जयललिता यांच्या बायोपिक नंतर आता ‘इमरजन्सी’ सिनेमा कंगना करतेय जो इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. तर लगेचच ‘इमरजन्सी’ नंतर कंगना बिनोदिनी दासी यांच्या बायोपिक मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार दिग्दर्शित करणार आहेत. प्रदिप सरकार यांनी ‘परिणीता’ सारखा दर्जेदार सिनेमा बॉलीवूडला दिला आहे.

या सिनेमाविषयी कंगनाचे म्हणणे आहे की,”प्रदीप सरकार यांची मी मोठी चाहती आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सिनेमा करणं हे माझं भाग्य समजते मी. सिनेमाचे लेखक प्रकाश कापडियां यांच्यासोबत पहिल्यांदाच सिनेमा करत असल्यानं आपण उत्सुक असल्याचं देखील कंगना म्हणाली. सिनेमाच्या माध्यमातून मला अनेक दर्जेदार कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणार हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे हे कंगनानं आवर्जुन सिनेमाची घोषणा करताना नमूद केलं आहे”

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!