Just another WordPress site

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाचा ‘मिस्टर मम्मी’ अडचणीत; मिस्टर मम्मीसाठी कथा चोरली? कोलकाता येथील निर्मात्याचा आरोप

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरचे चाहत्यांनी कौतुकही केले. या चित्रपटाद्वारे रितेश आणि जिनिलिया १० वर्षांनंतर ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहेत. मात्र याच दरम्यान ‘मिस्टर मम्मी’ वादात सापडला. कोलकाता येथील एका निर्मात्याने रितेशच्या या सिनेमाच्या निर्मात्यांवर कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप केला.

महत्वाच्या बाबी

१. रितेश-जेनेलियाच्या ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
२. रितेश आणि जिनिलिया १० वर्षांनंतर ऑनस्क्रिन एकत्र दिसणार
३. रितेश आणि जेनेलियाचा मिस्टर मम्मी वादाच्या भोवऱ्यात
४. आयुष्मान खुरानाच्या सिनेमाची स्क्रिप्ट चोरल्याचा झाला आरोप

बंगाली चित्रपट दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी यांचा मुलगा आकाश चॅटर्जी याने ‘मिस्टर ममी’च्या निर्मात्यांवर त्यांच्या चित्रपटाची कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप केला. आकाशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. शाद अली दिग्दर्शित “मिस्टर मम्मी” ची कथा चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत शेअर केलेल्या स्क्रिप्टमधून कॉपी करण्यात आली आहे, असा आरोप आकाशने त्याच्या फेसबुक अकाउंटवर अनेक स्क्रीनशॉट शेअर करत केला. यासोबतच जीमेलवरील संभाषणाचा स्क्रिनशॉटही आहे.
आकाश चॅटर्जीने दावा केला आहे की त्याने, २०१९ मध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. ही कथा एका तरुणाची आहे ज्याला रहस्यमयरित्या गर्भधारणा होते. आकाशने ही गोष्ट त्यावेळी ‘मिस्टर मम्मी’च्या निर्मात्यांसोबत शेअर केली होती आणि ते खूप प्रभावित झाले होते. आकाशने त्याच्या कथेचे शीर्षक “विकी पेट से” असे ठेवले होते आणि आयुष्मान खुरानाला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे ठरले होते. याशिवाय, अन्नू कपूर, भूमी पेडणेकर आणि गजराज राव यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात असणार होत्या. मात्र त्यानंतर निर्मात्याकडून पुढे कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही. आता, रितेश आणि जेनेलिया यांच्या ‘मिस्टर मम्मी’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर, त्याला समजले की रितेशच्या ‘मिस्टर मम्मी’ची स्क्रीप्ट तीन वर्षांपूर्वी त्याने लिहिलेल्या स्क्रिप्टशी खूप साम्य ठेवून आहे आणि त्यामुळेच त्याने दावा केला की चित्रपटाची कथा चोरी केली गेली.

आकाश यांनी म्हटले की त्याने “विकी पेट से” ची स्क्रिप्ट-पटकथा लिहिली आहे. आणि आता कायदेशीर कारवाई करण्याचा विचार तो करत आहे. आकाश चॅटर्जीने सांगितले की, गरज पडल्यास ‘मिस्टर ममी’च्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाईही करू शकतो. याबाबत आकाशने वकिलांशी चर्चाही केली आहे. आकाशने सांगितले की, त्याला पैसे नको आहेत, त्याला फक्त ‘मिस्टर मम्मी’ सिनेमाशी त्याचे नाव जोडायचे हवे. दरम्यान ‘मिस्टर मम्मी’ चे दिग्दर्शन शाद अलीने केले आहे तर टी-सीरीजची निर्मिती आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!