Just another WordPress site

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ सिनेमातील अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अभिनेत्यावर दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटातील अभिनेत्याला अटक करण्यात आली. प्रियांशू क्षत्रिय असं या अभिनेत्याचे नाव असून तो १८ वर्षांचा आहे. नागपूर शहर पोलिसांनी प्रियांशूला अटक केली. ‘झुंड’ या चित्रपटात त्याने बाबू ही भूमिका साकारली होती. ‘अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?’, हा त्याचा चित्रपटातील संवाद गाजला होता.

झोपडपट्टी परिसरातील मुलांना गुन्ह्यांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित ‘झुंड’ सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांची त्यात प्रमुख भूमिका होती. तर नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मंजुळेंनी सिनेमासाठी अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली मुलं शोधून काढली अन् त्यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. प्रियांशू क्षत्रिय यानेही या चित्रपटात बाबू छेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट समीक्षकांनी गौरवला होता. तेव्हा प्रियांशूच्या भूमिकेचीही चर्चा झाली होती. मात्र, आता १८ वर्षांच्या प्रियांशूला नागपूर पोलिसांनी अटक केली. प्रियांशूवर दागिने लंपास केल्याचा आरोप करण्यात आला. मानकापूर भागातील आंबेडकर हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रदीप मोंडावे या ६४ वर्षीय गृहस्थानं प्रियांशूच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. प्रियांशूनं आपल्या घरातून ५ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड चोरल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. त्या आधारे पोलिसांनी प्रियांशूला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांच्या राहत्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होते. याप्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचे उघड झालं.’ चोरी करण्यात आलेल्या वस्तू या गड्डीगोदाम परिसरात एका पेटीत सापडल्या, असंही पोलिसांनी सांगितलं.
नागपूर पोलिसांनी मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी प्रियांशूला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याआधी चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाही रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी प्रियांशूला अटक करण्यात आली होती. आता पुन्हा त्याला चोरीच्या प्रकणात अटक करण्यात आली.
दरम्यान, प्रियांशु हा एक चांगला फुटबॉलपटू देखील आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या संघाने फुटबॉलचा सामनाही जिंकला होता. फुटबॉल खेळल्यामुळे त्याची या चित्रपटासाठी निवड झाली होती. झुंड सिनेमात प्रियांशूनं त्याच्या बोली भाषेनं अमिताभसह सर्वांनाच प्रभावित केले होते. चित्रपटाच्या निमित्तानं झालेल्या प्रमोशनल कार्यक्रमातही त्यानं खऱ्या आयुष्यातील किस्से सांगितले होते. नागराजनं हिरा शोधला अशीच भावना त्यावेळी व्यक्त करण्यात येत होती. तर नागराजचा हिरा आता काळवंडला अशीच भावना व्यक्त होतेय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!