Just another WordPress site

शिंदे सरकार कोसळणार? मध्यावधी निवडणुकांची दाट शक्यता; सामनातून भाकीत

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले होते. यानंतर काहीवेळात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय प्राप्त केला होता. त्यानंतर शिवसेनचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांच्या (Midterm Elections in Maharashtra) शक्यतेबाबत भाष्य करण्यात आले आहे. कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत, असा निर्धार ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सामना’तून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे. अंधेरीत भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही, ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही नोटांचा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

भाजप आणि शिंदे गटाकडून नोटाचा प्रचार होऊनही एकूण मतदानापैकी १२,८०६ मते ‘नोटा’ या पर्यायाला मिळाली. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटा’ना भुलली ना ‘नोटा’ च्या भुलभुलैयालाई ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिथे गटाची मळमळ होती. मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारड्यात भरभरून मतदान केले आणि भाजप मिथ्यांचे कारस्थान उधळून लावले, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील
अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे. ‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक, असे गमतीचे विधान श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले होते. पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!