Just another WordPress site

कायम भाजपविरोधी असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी अचानक सौम्य भूमिका घेऊन यु-टर्न का घेतला?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकीय व्यूहरचना अनेकदा चकित करते. केंद्रातील भाजप सरकारविरोधातील त्यांची आक्रमकता नेहमीच उफाळून येते. संधी मिळाली की भाजपविरोधाची धार तीव्र करायची ही त्यांची ठरलेली रणनीती. मात्र, आता ममता बॅनर्जी दुसऱ्या टोकाला जात मवाळ झाल्याचं दिसतं. नेमकं ममता दिदींनी अचानक यु टर्न का घेतला? त्यामागे त्यांची राजकीय खेळी काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी 

१. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले होते संघाचे कौतूक
२. ‘केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायामागे मोदी नसतील’
३. ममता पुन्हा भाजप विरूध्द आक्रमक होणार का?
४. गैरव्यवहारामुळे ममतांकडून तडजोडीचे प्रयत्न सुरु

 

ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कौतूकाचं विधान केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सगळीच वाईट लोकं नाहीत. त्यातले काही भाजपाचे समर्थन करीत नाहीत, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होतं. तर त्यानंतर बंगाल विधासनभेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात एक प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १८९, तर विरोधात ६९ मते पडली. यावेळी ममता बॅनर्जी केलेल्या भाषणानं सर्व जण गोंधळून गेले. ममता यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  केंद्रीय तपास यंत्रणांना करत असलेल्या कारवायामागे  पंतप्रधान असतील, असं मला वाटत नाही. मात्र,  भाजपचे काही नेते असू शकतात आणि ते सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग करत आहेत. ममता यांच्या भाषणाने सभागृहाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण विधानसभेत बोलण्याअगोदर अनेकदा ममतांनी मोदी हे सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधकांविरुद्ध कारवाई करत असल्याचा आरोप केला होता.
विरोधकांची मोट बांधण्याचा विषय निघाला की चर्चेच्या केंद्रस्थानी ममता असतातच. या पार्श्वभूमीवर संघ आणि मोदींबाबत नरमाईची भूमिका घेऊन अन्य विरोधक पक्षांना बुचकळ्यात टाकल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.  खरंतर याआधी काही महिन्यांपूर्वी ममता दिदिंनी मुंबई दौरा केला होता.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी त्या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, नंतर महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही  शिक्षक भरती घोटाळा उघड झाला. या बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे बंगाल राज्य सरकारपर्यंत जाऊन पोहोचले.  यात ममतांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली.
ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते अडचणीत आले आहेत. अशावेळी ममता बॅनर्जी या केंद्र सरकारविरुध्द आक्रमक होतील, असं वाटलं. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात नसून भाजप नेत्यांचा एक गट स्वार्थासाठी ही खेळी खेळत आहे. सीबीआय कारवाईला गृह मंत्रालय जबाबदार असते, असे मत ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत मांडले. हे वक्तव्य सर्वांना बुचकळ्यात टाकणारे आहे. खरंतर राजकारणात कधी काय होईल, हे सांगणे कठीण आहे. शत्रू असणारे कधी मित्र होतील आणि मित्र असणारे कधी शत्रू होतील, याचा थांगपत्ता लागत नाही. पश्चिम बंगालमध्ये असेच काहीसे पाहावयास मिळत आहे.
मोदी यांच्या विरोधात विरोधकांची मोट बांधणार्‍या आणि दिवस-रात्र केंद्र सरकारला दूषणे देणार्‍या ममता बॅनर्जी यांचा सूर अचानक बदलल्याने स्वपक्षातील नेते गोंधळून गेले. सध्या बंगालमध्ये शिक्षक भरती गैरव्यवहारापासून कोळसा तस्करीसह अनेक प्रकरणांत ईडीने बंगालमध्ये २१ ठिकाणी छापेमारी केली. त्यामुळं तृणमूल काँग्रेस पक्ष अडचणीत आला. पक्ष वाचवण्यासाठी ममतांनी आपला आक्रमकपणा कमी केल्याचं बोलल्या जातं.
ममता यांनी ही राजकीय खेळी खेळताना ईडी कारवाईमागे पंतप्रधानांचा हात नसावा, असे सूतोवाच करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष प्रहार केल्याचं राजकीय जाणकार सांगतात. याशिवाय,  बंगालमधील भ्रष्टाचार, गैरव्यवहार प्रकरणात तृणमूलचे नेते, मंत्री अणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी ही मंडळी अडकली असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी ममता बॅनर्जी तडजोड करत आहेत, असंही काही जाणकार सांगतात. दुसरं म्हणजे,  मोदी भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध कारवाई करत असल्याचं देशात चित्र आहे. त्यामुळं त्यांना लक्ष करणं म्हणजे, भ्रष्टाचार विरुध्द कारवाईला विरोध करणं, हा संदेश यातून गेला असता.  त्यामुळं ममता बॅनर्जी यांचं राजकीय नुकसानचं अधिक झालं असतं. त्यामुळं ममतांनी भाजपविरूध्द सौम्य भूमिका घेतली. तर काही राजकीय जाणकारांच्या मते, बंगाल सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्याला केंद्राकडून आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळं राजकीय डावपेचात बदल करून मोदी यांच्यावर थेट टीका करण्याऐवजी अन्य नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याचे धोरण अवलंबिले का किंवा यामागे आणखी काही कारण आहे, हे आताचं सांगण कठीन आहे. . दरम्यान,  थेट रस्त्यावर उतरून लढा देण्याचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. भल्याभल्यांना त्यांनी गार केलं.  टोकाच्या संघर्षातूनच त्यांची राजकीय कारकीर्द उभी राहिली. त्यामुळं त्या पुन्हा भाजप विरूध्द आक्रमक होणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!