Just another WordPress site

भाजपनं अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये, असं पत्र राज ठाकरेंनी भाजपला का लिहिलं? राज यांच्या मनात काय शिजतंय?

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला पार पडणार आहे. राजकारणात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. मात्र, मागील काही वर्षात भाजपने ही परंपरा मोडीत काढली. अशातच आता भाजपनं अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये, ऋतुजा लटके यांच्यासाठी ही जागा सोडावी, असं पत्र मनसे प्रमुख राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं. दरम्यान, राज ठाकरेंची फडणवीसांना पत्र लिहिण्यामागे काय राजखेळी आहे? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. ‘भाजपनं अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये’
२. राज ठाकरेंनी लिहिलं देवेंद्र फडणवीसांना पत्र
३. राज यांच्या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
४. ऋतुजा लटकेंविरोधात भाजप माघार घेणार का?

 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर भाजपच्या वतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित झालं होतं. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर भाजपचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यासह लढत आहे. तसंच आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेत उद्धव यांच्यावर निशाणा साधला होता. एकीकडे उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत असताना दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून राज यांच्या भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही जवळीक वाढली होती. त्यामुळं राज ठाकरे हे देखील भाजप उमेदवाराला आपला पाठिंबा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज ठाकरे यांनी काल एक ‘लेटरबॉम्ब’ टाकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत थेट भाजपच्या उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घ्यावी, असं आवाहन केलं. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या पत्राचा जरी विचार करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची देखील चर्चा करावी लागेल, असं फडणवीसांनी सांगितलं. मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील मला चर्चा करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता ऋतुजा लटकेंविरोधात भाजप माघार घेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

दरम्यान, आता गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीबाबत घमासान सुरू असताना शांत असलेल्या राज ठाकरे यांनी भाजपला इतक्या उशिरा का पत्र लिहिलं, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतेय. राज यांनी या पत्रातून आपल्यातील संवेदनशील व्यक्तीचं दर्शन तर घडवलंच आहे, मात्र राजकीय चातुर्यही दाखवलं आहे.

खरंतर पोटनिवडणुकीत जेव्हा त्या मतदारसंघातील दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती निवडणुकीच्या रणांगणात असते, तेव्हा मनसेकडून उमेदवार दिला जात नाही, हे मनसेनं याआधी दाखवून दिलं. मग आता अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत दिवगंत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशात मनसेनं जर लटके यांच्याविरोधात भूमिका घेतली असती तर पक्षाबाबत जनमाणसांमध्ये चुकीचा संदेश गेला असता, त्यामुळं राज ठाकरेंनी ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिल्याचं राजकीय जाणकार सांगतात. राज यांनी फडणवीसांना पत्र लिहिण्यामागे दुसरा महत्वाचा फॅक्टर हा आहे की, ऋतुजा लटके ह्या मराठी उमेदवार आहेत, तर भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते मुरजी पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असले तरी ते मूळचे महाराष्ट्रातील नाहीत. त्यामुळे या निवडणुकीलाही आगामी काळात मराठी विरुद्ध अमराठी असा रंग येण्याची शक्यता अधिक आहे. मनसेनं कायम मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आपलं राजकारण केलं. अशात मनसेनं भाजपला पाठिंबा दिला असता तर ते मनसेच्या प्रतिमेसाठी घातक ठरलं असतं, त्यामुळं राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिल्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली. सेनेतील बंडानंतर आता राज यांना मनसे वाढवण्यासाठी मोठी स्पेस निर्माण झाली. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे. अशा स्थितीत मराठी माणसांसाठी मनसे हाच एकमेव पर्याय आहे, असं राज ठाकरे यांच्याकडून आगामी काळात ठासून सांगितलं जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय मतभेद असतानाही राज ठाकरे यांनी आज ऋतुजा लटके यांच्या बाजूने पत्र लिहीत मराठी मतदारांसह शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये आपल्याबाबत अप्रत्यक्षरीत्या सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा, असाही अंदाज आता व्यक्त केला जातोय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!