Just another WordPress site

खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी आयपीएल संघांकडे पाण्यासारखा पैसा येतो कोठून?

आयपीएल स्पर्धा म्हटलं की पैशाची चर्चा होते. खेळाडूंना लागणाऱ्या कोट्यवधींच्या बोली डोळ्यासमोर तरळू लागतात. आयपीएल १६ व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काल कोचीत लिलाव झाला. या ‘आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा जोरदार पाऊस पडला. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रेंचायजीमध्ये चांगली चुरस दिसून येत होती; एकूणच खेळाडूंवर पैशांचा पाऊस खूप पडला. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, खेळाडूंवर एवढा खर्च करणाऱ्या फ्रेंचायजी पैसे कसे कमवतात? खेळाडूंवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा येतो कुठून? याच विषयी जाणून घेऊ.

IPL च्या प्रसारणातून मिळतो पैसा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे, बीसीसीआय हे आयपीएलचे संचालन करते आणि या दोघांच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठं साधन म्हणजे, मीडिया आणि प्रसारण. आयपीएल फ्रँचायझी त्यांचे मीडिया हक्क आणि प्रसारण हक्क विकून जास्तीत जास्त पैसे कमवतात. कोणत्याही मीडिया चॅनेलला आयपीएलच्या खेळाचे प्रसारण करण्याचे अधिकार बीसीसीआयकडून विकत घ्यावे लागतात. सध्या प्रसारणाचे अधिकार हे स्टार स्पोर्ट्स या चॅनेलकडे आहेत. एका अहवालानुसार, सुरुवातीला बीसीसीआय प्रसारण अधिकारातून मिळणाऱ्या कमाईपैकी २० टक्के रक्कम ठेवत असे आणि ८० टक्के रक्कम संघांना मिळत असे. पण हळूहळू हा वाटा ५०-५० टक्क्यांपर्यंत वाढला. आयपीएल संघाच्या एकूण कमाईपैकी ६० ते ७० टक्के वाटा हा मीडिया हक्कांचा आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कंपन्या फक्त १० सेकंदाच्या स्लॉटसाठी लाखो रुपये खर्च करतात. या कमाईतून, चॅनेल बीसीसीआयला मोठी रक्कम देतात, ज्यामधून बीसीसीआय त्यांचे समभाग काढून घेतल्यानंतर उर्वरित रक्कम संघांच्या मालकांना देते.

जाहिरातीतून बक्कळ कमाई

आयपीएल मीडिया ब्रॉडकास्टचे हक्क विकण्यासोबतच जाहिरातींमधून अर्थात प्रायोजकांच्या माध्यमातूनही भरपूर पैसे कमावतात. प्रत्येक आयपीएल संघाचे स्वत:चे प्रायोजक असतात. खेळाडूंच्या जर्सीवर विविध ठिकाणी या प्रायोजकांची नावं तुम्हाला दिसतील. प्रत्येक प्रायोजकाकडून आयपीएल संघाला ठराविक रक्कम मिळते. जर्सीवर, सरावाच्या किटवर प्रायोजकांच्या ब्रँडचं नाव तुम्हाला दिसेल. जितके जास्त प्रायोजक, तेवढी नावं जास्त आणि तेवढी जास्त कमाई असते.

प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळणारा पैसा

गेट मनी म्हणजे स्टेडियमवर तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळणारा पैसा. भारतात क्रिकेटची पूजा केली जाते. क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलची प्रचंड क्रेझ आहे. प्रेक्षकांच्या मागणीच्या आधारे तिकिटाची किंमत संघ मालक ठरवतात. आयपीएल आला की प्रेक्षक मैदानात येतात. आयपीएलमध्ये तिकिटांच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावले जातात. एका अंदाजानुसार, यापूर्वीच्या लीगमध्ये झालेल्या जवळपास ६० ते ७० टक्के सामन्यांमध्ये स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असते. जवळपास १० टक्के उत्पन्न सामन्यांच्या तिकिटांमधून मिळते.

याशिवाय, प्रत्येक आयपीएल संघ मर्चंडायझिंगच्या माध्यमातून पैसा कमावतो. जर्सी, ट्रॅकपँट, टोप्या, सॅक, सोव्हेनियर, ऑटोग्राफ बॅट, मोबाईल कव्हर अशा अनेक गोष्टी स्पर्धेआधी, स्पर्धेदरम्यान विकल्या जातात. या वस्तूंच्या विक्रीतून आयपीएल संघांना पैसा मिळतो. तसचं जेतेपद पटकावल्यानंतर विजेत्या संघाला घसघशीत बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं. ही रक्कमही आयपीएल संघासाठी उत्पन्नाचा हिस्सा आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला या पैशाचा वाटा मिळतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!