Just another WordPress site

प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या सीट बेल्टचा इतिहास काय? Seat Belt कसा बनला? त्याच्या शोधाचं श्रेय कुणाला जातं?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अलीकडेच अपघाती निधन झाले. त्यांच्या आधीही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे अपघाती निधन झाले. या महत्त्वाच्या व्यक्ती असल्या तरी एकूणच जगभरात सुमारे पाच दशलक्ष लोक अपघातात दरवर्षी मरतात. त्यामुळं सुरक्षितेच्यादृष्टीने सीट बेल्टचा वापर आवश्यक असल्याच्या मुद्यावर तज्ज्ञांनी भर दिला. १ नोव्हेंबर पासून मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं. दरम्यान, ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचतात, अशा सीट बेल्ट इतिहास तरी काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. सीट बेल्टच्या शोधाचं श्रेय सर जॉर्ज कॅली यांना जातं
२. ​१८८५ साली टॅक्सीमध्ये सीट बेल्टचा पहिल्यांदा वापर
३. १९५० मध्ये रेसिंग कार्समध्ये सीट बेल्ट वापरण्यात आला
४. सध्याच्या कार्समधील सीट बेल्ट हा ३ पॉईंट सीट बेल्ट आहे

 

सुरक्षित वाहन प्रवासातील पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे सीटबेल्ट. हा सीटबेल्ट नेमका कशासाठी बनवला होता, ही गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सीट बेल्टच्या शोधाचं श्रेय सर जॉर्ज कॅली यांना जातं. इसवी सन १८०० च्या सुमारास त्यांनी ग्लायडरसाठी सीट बेल्ट डिझाइन केले. विमान वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाच्या संशोधकांमध्ये कॅली यांची गणना केली जाते. मात्र त्यांचं डिझाईन सुरुवातीला कारमध्ये उपयुक्त ठरलं नाही.

तर कारमध्ये वापरण्यात येणारा सीट बेल्ट तयार करण्याचे श्रेय अमेरिकन संशोधक एडवर्ड क्लॅगहॉर्न यांना जातं. क्लॅगहॉर्न यांनी १८८५ मध्ये सीट बेल्ट डिझाईन केला आणि न्यूयॉर्कमधील टॅक्सीमध्ये त्याचा वापर केला गेला. १९४० पर्यंत सीटबेल्टची लोकप्रियता वाढली. मात्र सुरुवातीच्या काळात सीट बेल्टमुळे फारशी सुरक्षितता मिळत नव्हती. त्या डिझाईनमध्ये काही त्रुटी होत्या. १९४६ मध्ये डॉ. सी. हंटर शेल्डन यांनी रीट्रॅक्टेबल सीट बेल्ट डिझाईन केला. एअरबॅग्ज आणि रिसेस्ड स्टीयरिंग व्हील सारख्या सेफ्टी स्टँडर्ड्सचं श्रेय देखील त्यांनाच जातं. डॉक्टर शेल्डन हे कॅलिफोर्नियातील Huntington Memorial Hospital या रुग्णालयात न्यूरोसर्जन होते. कार अपघात गंभीर जखमी झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल त्यांच्याकडे दाखल होत असतं. त्यातील बहुतांशी जणांना डोक्याला मार लागलेला असायचा. यावर तोडगा म्हणून त्यांनी सीट बेल्ट तयार केला. डॉ. शेल्डनच्या डिझाइननंतर सीट बेल्टची लोकप्रियता वाढली आणि १९५० च्या आसपास जवळजवळ सर्व रेसिंग कारमध्ये सीट बेल्टचा वापर केला जाऊ लागला. नंतर रेसिंग कारमध्ये सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आला.

रेसिंग कार्समध्ये सीट बेल्ट अनिवार्य केल्यानंतर प्रवासी वाहनांमध्ये देखील सीट बेल्ट दिले जाऊ लागले. १९५० च्या दशकात त्याची सुरुवात झाली. नॅश आणि फोर्ड या कंपन्या या बाबतीत आघाडीवर होत्या. अमेरिकन कंपनी नॅशने पहिल्यांदा १९४९मध्ये आपल्या कारमध्ये सीट बेल्टचा समावेश केला होता. या दोन्ही कंपन्यांनी पर्यायी सीट बेल्ट देण्यास सुरुवात केली, ज्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. मात्र ग्राहक सीट बेल्टशिवाय कार खरेदी करणं पसंत करायचे. केवळ २ टक्के ग्राहक त्यांच्या कारमध्ये सीट बेल्ट वापरत होते. स्वीडिश कार निर्माती कंपनी साबने पहिल्यांदाच आपल्या कारसाठी सीट बेल्ट एक स्टँडर्ड फीचर म्हणून सादर केलं. त्यानंतर व्हॉल्वो कंपनीने त्यांच्या वाहनांमध्ये सीट बेल्ट अनिवार्य केला.

सीट बेल्टची सुरुवात झाली तेव्हा टू पॉईंट सीट बेल्ट होते. यामुळे फक्त कंबरेला सुरक्षा मिळत होती. त्यानंतर सीट बेल्टच्या डिझाइनमध्ये बदल होत गेला आणि शरीराची सुरक्षा अधिक चांगली झाली. सध्याच्या कार्समध्ये असणारा सीट बेल्ट हा ३ पॉईंट सीट बेल्ट आहे. सीट बेल्टच्या डिझाइनमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. चार, पाच, सहा पॉईंटचे सीट बेल्ट आहेत. मात्र, हे सगळे सीट बेल्ट रेसिंग कारमध्ये असतात. ७ पॉईंटच्या सीट बेल्टचा वापर एअरक्राफ्टमध्ये पायलटच्या आसनावर होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!