Just another WordPress site

Unparliamentary Words: सचिवालयाकडून असंसदीय शब्दांची यादी जाहीर, कधी काळी ‘गोडसे’ शब्दालाही संसदेत नो एंट्री होती

संसदेच्या कामकाजादरम्यान सरकार ‘हुकूमशहा’ झाले,  किंवा विरोधक ‘हुकूमशाही’ करताहेत. असं जर कोणी खासदार म्हणत असेल तर आता संसदेच्या नवीन नियमांनुसार हे शब्द असंसदीय मानले जातील.  इतकंच नाही तर संसदेत कुणाला जयचंद म्हणणं, कुणाला विनाश पुरुष हा शब्द वापरणं, कुणाला खलिस्तानी म्हणणं, कुणाला जुमलाजीवी या शब्दाने संबोधणं हे असंसदीय मानले जाईल.. लोकसभा आणि राज्यसभेच्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा नियम लागू केला जाणार आहे.  दरम्यान, नेमके कोणते शब्द असंसदीय ठरवले? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु 

२. सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची यादी जाहीर

३. सचिवालयाने असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रकाशित केली

४. अध्यक्षांना आहे असंसदीय शब्द हटवण्याचा अधिकार 


संसदेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होतेय. अधिवेशन म्हणलं कि,  सत्ताधारी अन विरोधकांचा राडा आणि गोंधळ आलाच. या राड्यात सरकारवर टीका करतांना राजकारणी कुठली भाषा वापरतात, हे आपण ऐकत असतो. गेल्या वर्षी संसदेच्या पावसाळी शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्क गोंधळावरुन राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं होतं. याच निमित्ताने अधिवेशनाच्या  पार्श्वभूमीवर खासदारांना असंसदीय शब्द कोणते आहेत याची माहिती दिली जाते.  येत्या अधिवेशनाच्या आधीच लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रकाशित केलीये. त्यामुळे खासदारांना आता संसदेत बोलताना स्वत:वर ताबा ठेवावा, लागणार आहे. 


कोणत्या शब्दांवर येणार टाच?

जुमलाजीवी, बाल बुद्धि, बहरी सरकार, उल्टा चोर कोतवाल को डांटे, उचक्के, अहंकार, कांव-कांव करना, काला दिन, गुंडागर्दी, गुलछर्रा, गुल खिलाना, गुंडों की सरकार, दोहरा चरित्र, चोर-चोर मौसेरे भाई, चौकड़ी, तड़ीपार, तलवे चाटना, तानाशाह, दादागिरी, दंगा या शब्दांसोबत काही इंग्रजी शब्दही असंसदीय शब्दांच्या यादीत टाकण्यात आलेत. लोकसभेतील किंवा राज्यसभेतील चर्चेदरम्यान जर हे शब्द वापरले तर ते रेकॉर्डवरून काढले जातील. इंग्रजी शब्दांच्या यादीमध्ये अब्यूज, ब्रिट्रेड, करप्ट, ड्रामा, हिप्पोक्रेसी आणि इनकॉम्पिटेंट, कोविड स्प्रेडर आणि स्नूपगेट या शब्दांचा समावेश आहे.  म्हणजेच संसदेच्या कामकाजादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत हे शब्द वापरता येत नाहीत.  याशिवाय, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तसेच पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून काही शब्दांना आणि वाक्यांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. यात ‘आपण माझा वेळ वाया घालवत आहात’, ‘तुम्ही आमचा गळा दाबून टाका’, ‘खुर्चीला कमजोर केलं आहे’, ‘ही खुर्ची सदस्यांचं संरक्षण करु शकत नाही’ अशा वाक्यांचा समावेश आहे.  


कसे हटवले जातात असंसदीय शब्द? 

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जर अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला तर तो शब्द हटवण्यासाठी ते आदेश देतात. तर नियम ३८१ नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो. 


दरम्यान, विरोधी पक्षातील नेतेमंडळी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना यातील बरेचसे शब्द वापरतात. मात्र आता असे शब्द वापरता न आल्यास ही विरोधकांची गळचेपी असल्याचा आरोप केला जातोय. ही तर हुकुमशाही आहे, अशी टीका शिवसेनेच्या संजय राऊतानी केलीये. त्यामुळं असंसदीय शब्दांवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


गोडसे हा शब्द देखील असंसदीय होता

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली होती. त्यामुळं निषेध म्हणून १९५६ पासून गोडसे या शब्दाचा वापर संसदीय कार्यप्रणालीत केला जात नव्हता. मात्र,  २०१४ साली झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी माकपच्या पी. राजीव यांनी चर्चेदरम्यान ‘गोडसे’ हा शब्द वापरला होता. तेव्हा तो शब्द  कामकाजातून वगळण्यात आला होता. राजीव यांनी स्पष्टीकरण मागितल्यावर राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी ‘गोडसे’ शब्द असंसदीय असल्याचे सांगितलं होतं. मात्र पुढं हेमंत गोडसे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की,  संसदेत गोडसे हा शब्द असंसदीय आहे. त्यावेळी त्यांनी ‘माझे आडनाव असंसदीय कसे’, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत वेदनादायी असल्याची भावना लोकसभा सचिवालयास पत्राद्वारे कळवली होती. त्यावर सचिवालयाने ‘गोडसे शब्द सरसकट असंसदीय ठरवता येणार नाही’, असा शेरा मारला होता.  ‘महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे नाव नथूराम गोडसे होते; म्हणून ‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरवता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी पत्रात सांगितले होते. याचीच दखल घेऊन सुमित्रा महाजन यांनी ‘गोडसे’ शब्द असंसदीय यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गोडसे’ शब्द संसदीय तर ‘नथूराम गोडसे’ असंसदीय ठरेल, असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!