Just another WordPress site

उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकारी निवडला; सरन्यायाधीश पदासाठी डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस, कोण आहेत डी. वाय. चंद्रचूड?

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली. दरम्यान, लळीत यांनी ज्यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस केली ते न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपला उत्तराधिकारी निवडला
२. लळीत यांनी केली सरन्यायाधीश पदासाठी चंद्रचूड यांची शिफारस
३. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश असणार
४. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात झाला

 

महाराष्ट्राचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांनी आपल्या कमी कालावधीमध्ये खटल्यांच्या वेळकाढूपणावर रामबाण उपाय काढला होता. आता त्यांनी पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश असणार आहेत. लळीत यांनी २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल केवळ ७४ दिवसांचा असून ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले. सध्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ आहेत. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांच्याच नावाची शिफारस होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा कार्यकाल ९ नोव्हेंबर २०२२ पासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत म्हणजे दोन वर्षांचा असणार आहे.

न्यायधीश चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. ते एका मराठी कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी आपलं पुढंच शिक्षण दिल्लीत घेतलं. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि भारताचे सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. चंद्रचूड हे १३ मे २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीस बनण्यापूर्वी ते आलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यापूर्वी त्यांनी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. त्यांनी सन १९९९ मध्ये भारताचे एसएजी म्हणूनही काम पाहिले आहे. पुढं २००० साली मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर त्यांची नियुक्ती झाली. ते महाराष्ट्र ज्युडीशियल अॅकेडमीचे संचालक होते.

आता न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड सरन्यायाधीश बनल्यानंतर देशाच्या इतिहासातील ते पहिले न्यायाधीश असतील ज्यांना त्यांच्या वडिलांसह भारताचे सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार आहे. डी वाय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड़ हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ हा २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै, १९८५ एवढा प्रदीर्घ म्हणजेच सात वर्षांचा राहिला होता. ते रिटायर झाल्यानंतर ३७ वर्षांनी त्यांचा मुलगा सरन्यायाधीश पदावर बसणार आहे. डी वाय चंद्रचूड हे धडक निर्णयांसाठी देखील चर्चेत असतात. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी कायदा मंत्री किरण रिजिजू यांना चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली. ९ नोव्हेंबरला नव्या सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांना शपथ दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!