Just another WordPress site

महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, BJPला ६० टक्के, तर शिंदे गटाला ४० महामंडळे मिळणार

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराइतक्याच महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या महामंडळांचे वाटपही येत्या दोन दिवसात होणार आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची चर्चा आहे. यातही भाजपचा वरचष्मा पहायला मिळत आहे. कारण महामंडळ वाटपात भाजपला ६० टक्के, तर शिंदे गटाला ४० टक्के असे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानुसार महामंडळापैकी ६० टक्के भाजपला, तर ४० टक्के शिंदे गटाला मिळणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार हे वाटप झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यात एकूण १२० महामंडळं आहेत. यापैकी निम्मी म्हणजेच जवळपास ६० महामंडळं ‘मलईदार’ मानली जातात. यापैकी पहिल्या टप्प्यात याच ६० महामंडळांचं वाटप होणार आहे. त्यापैकी ६० टक्के म्हणजेच ३६ च्या आसपास महामंडळं भाजपच्या वाट्याला, तर २४ महामंडळं बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या एक-दोन दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात घोषणा करण्याची चिन्हं आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराचीही प्रतीक्षा

दुसरीकडे, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याच्या चिन्हं आहेत. यामध्ये शिंदे गटातील चार आमदारांना, तर भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय बच्चू कडू यांच्याही मंत्रिपदाची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम यांचीही नावं चर्चेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!