Just another WordPress site

प्रकृती अजून ठणठणीत नसल्याने शरद पवारांना तूर्तास डिस्चार्ज नाही, शिर्डीतल्या चिंतन शिबिरालाही राहणार अनुपस्थितीत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना तूर्तास डिस्चार्ज मिळणार नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृती बिघडल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवारांना उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अजून ठणठणीत नाही. त्यामुळे त्यांचा रुग्णालयातला मुक्काम वाढल्याचे समजते.

पत्रात काय म्हटले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसने एक पत्र काढून पवारांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. पवारांना २ नोव्हेंबर २०२२ रोजी डिस्चार्ज मिळेल. ते ३ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ व ५ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये.

डॉक्टर काय म्हणतात?

खासदार सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती काल दिली होती. मात्र, पवारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना अशी माहिती दिली की, शरद पवार यांना बर होण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांना आता शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरालाही हजेरी लावता येणार नाही.

प्रकृती कशी आहे?

शरद पवार यांच्यावर गेल्यावर्षी मार्चमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, पोटदुखीमुळे त्यांना मंगळवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या पित्ताशयात खडे झाल्याचे समोर आले. एन्डोस्कोपीद्वारे पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आहेत. मात्र, अजून त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नसल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!