Just another WordPress site

Shankarpat । बैलगाडा शर्यतींचा नेमका इतिहास काय? या शर्यतीची सुरूवात कुठून झाली?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून कोर्टानं बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला. बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानं आता अवघ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. दरम्यान, बैलगाडी शर्यतीची प्रथा-परंपरा नेमकी सुरु कुठून झाली? या शर्यतीचा नेमका इतिहास काय? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. 



हायलाईट्स

१. राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा

२. सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

३. या खेळाला शंकरपट म्हणूनही ओळखलं जातं

४. अनेक राज्यात खेळल्या जाते बैलगाडा शर्यत


ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी  बैलगाडा शर्यत ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. त्यामुळे बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी बैलांना प्रशिक्षण दिलं जातं. बघ्यांसाठी पर्वणी असलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जात असे. दरम्यान, शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असं सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जुलै २०११ मध्ये १९६० च्या  प्राणी छळ प्रतिबंधक कायद्याचा आधारे बैलाचा गॅझेटमध्ये समावेश केला. याच गॅझेटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मे २०१४ मध्ये बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली. दरम्यान, घरात मल्ल आणि दारात वळू हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या शेतकऱ्याचा बैल न्यायालयीन प्रक्रियेत अडकला.  बैलगाडा शर्यतीवरील ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठली. बैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्ह्णून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षाची परंपरा आहे. देशात पंजाबमधील किल्ला रायपूर येथेही प्राचीन काळापासून मिनी ऑलंपिक म्हणून बैलांच्या शर्यती बाबतचे उल्लेख सापडतात.  पारंपरिक संस्कृतीचा वारसा आणि शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. स्पेनमधील बैल पळवण्याच्या स्पर्धा ही खूप जुनी समजली जाते. १४ व्या शतकाच्या सुमारास ईशान्य स्पेनमध्ये बैलांसमोर धावण्याची परंपरा सुरु झाली.  ‘एन्सिएरो ऑफ पॅम्प्लोना’असं नाव असलेल्या या शर्यतीत त्वेषाने धावणाऱ्या बैलांसमोर जीवाच्या आकांताने पळताना अनेक जणांना उत्साह वाटत असे. पुढे १८-१९ व्या शतकात स्पेनपासून अनेक मैल अंतरावर असलेल्या आशिया खंडात म्हणजे, आपल्या देशात, ग्रामीण भागात दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा. बैलांचा प्रजोत्पादनासाठी मर्यादित राहिलेला वापर पुढे सामान, कृषी उत्पादन आणि मानवी वाहतुकीसाठीही होऊ लागला. बैलाच्या आक्रमक स्वभावाचा अन्यत्र उपयोग व्हावा, या हेतूने आधी बैलगाडी अस्तित्वात आली. बैलाची मालकी आणि देखभाल करणं हा अभिमानाची गोष्ट मानली जात असे. त्यातूनच   ज्यांना परवडत होतं, त्यांनी बैलगाडी शर्यतीत उतरवण्यासाठी बैलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात या खेळाला शंकरपट म्हणूनही ओळखलं जातं. कर्नाटकात कंबाला, तामिळनाडूत रेकला,  तर पंजाबमध्ये बौलदा दी दौड  या नावाने ही शर्यत ओळखली जाते. याशिवाय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बैलगाडा शर्यती खेळल्या जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!