Just another WordPress site

Security Survice : Z+, Z, Y आणि X सिक्युरिटी म्हणजे काय? या सुरक्षा कुणाला, कशी आणि का दिली जाते?

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राणे यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत त्यांची सुरक्षा अपग्रेड करून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षादेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी शिवसेनेबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणावला देखील वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र देशातील एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे सुरक्षा देण्याचा निर्णय कोण घेतं? कोणत्या आधारवर हा निर्णय घेतला जातो? या सुरक्षेसाठी पैसे कुठून पुरवले जातात? कोणती सुरक्षा कोणत्या व्यक्तीला दिली जाते? हे कसं ठरतं? याच विषयी जाणून घेऊया. 



अनेकदा एखाद्या सरकारी पदावर असणाऱ्या व्यक्तींला त्या पदावर असल्यामुळे सुरक्षा पुरवली जाते. यामध्ये राष्ट्रपतींबरोबरच पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तींचा समावेश होतो. शिवाय, भारतात काही विशिष्ट व्यक्तींना पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षा प्रदान केली जाते. संभाव्य धोक्याची शक्यता किती आहे, यावरून कोणत्या दर्जाची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते. आपल्या देशात  Z+, Z, Y आणि X ह्या सिक्युरिटी लेव्हल्स आहेत.


स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा काय आहे?

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही देशातील उच्चस्तराची सुरक्षा फोर्स आहे.ही सुरक्षा केवळ मर्यादित व्हीव्हीआयपींनाच पुरवली जाते. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा चार स्तराची असते. विद्यमान आणि माजी पंतप्रधानांसह त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८८ साली एसपीजी सुरक्षा फोर्सची स्थापना करण्यात आली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एसपीजीची सुरक्षा आहे. या सुरक्षा फोर्सचं वार्षिक बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त असतं. 


झेड प्लस सुरक्षा काय आहे?

झेड प्लसमध्ये तीन स्तराची सुरक्षा असते. यात एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी ३६ जण तैनात असतात. त्यापैकी १० एनएसजीचे विशेष कमांडो असतात. ते प्रथम स्तराची सुरक्षा सांभाळतात. यानंतर एसपीजीचे इतर जवानांना दुसऱ्या स्तराच्या सुरक्षेची जबाबदारी असते. तिसऱ्या स्तराची जबाबदारी निमलष्करी दल म्हणजे, आयटीबीपी, सीआरपीएफ, सीआयएसएफ जवानांवर असते. यातील प्रत्येक कमांडो हा मार्शल आर्ट्स मध्ये निपुण असतो. या सिक्युरिटी मध्ये नवीन जमान्याच्या MP5 गन्स आणि आधुनिक गॅजेट्स वापरली जातात. ज्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो अशा केंद्रीय मंत्र्यांना किंवा महत्त्वाच्या व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा दिली जाते. भाजपा अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा आहे.


झेड प्रकारची सुरक्षा कुणाला आहे?

झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये २२ जण सुरक्षेसाठी तैनात असतात. यात चार तेच पाच एनएसजी कमांडो आणि बाकी पोलीस दलातील व्यक्ती असतात. राज्य सरकार किंवा सीआरपीएफकडून अतिरिक्त सुरक्षा दिली जाते. या कॅटेगरीतील कमांडो सबमशीन गन आणि संवादाच्या अत्याधुनिक साधनांनी सज्ज असतात. ही सुरक्षा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये योगा गुरू रामदेव आणि सिने अभिनेता आमिर खान अशा व्यक्ती सामील आहेत. 


वाय प्लस सुरक्षा काय आहे? 

वाय प्लस श्रेणीमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षारक्षकासह निवासस्थानी एक गार्ड कमांडर आणि चार गार्ड तैनात असतात. या गार्डपैकी एक हा उपनिरीक्षक पदाचा अधिकारी असतो. तर इतर तीन सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असतं.


वाय सुरक्षा काय आहे? 

या कॅटेगरीत येणाऱ्या व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी ११ सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यात दोन कमांडोज, आणि बाकी पोलीस ऑफिसर्स कर्तव्य बजावत असतात. दोन पीएसओ म्हणजे, Personal Security Officer सुद्धा असतात. भारतामध्ये बऱ्याच महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा प्रदान केली गेलीय… 


एक्स सुरक्षा काय आहे? 

या कॅटेगरीतंर्गत फक्त दोन जण सुरक्षेसाठी दिले जातात. हे खूप सामान्य दर्जाचे सुरक्षाकवच आहे.  यात कमांडो सामील नसतात तर २ पोलीस ऑफिसर्स संरक्षणासाठी तैनात असतात. सोबतच १ पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा या सुरक्षा श्रेणीत असतो. भारतात अनेक व्यक्तींना एक्स दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

 

कोणती सुरक्षा द्यावी हे कसं ठरतं?

एखाद्या व्यक्तीला कोणत्याप्रकारची सुरक्षा पुरवली जावी याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेतं. मात्र हा निर्णय घेताना इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉचा सल्ला घेतला जातो.  महत्वाच्या व्यक्तीच्या जीवाला धोका असेल तरच अशी सुरक्षा पुरवली जाते. त्याआधी ह्या यंत्रणा सगळ्या बाबींचा सखोल अभ्यास करूनच गृहमंत्रालयाला सल्ला देतात.


कोणत्या यंत्रणा सुरक्षा पुरवतात?

पंतप्रधान वगळता इतर महत्वाच्या व्यक्तींना राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजी, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जाते.


सुरक्षेचे पैसे कोण भरतं?

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा सरकार एखाद्या व्यक्तीला सुरक्षा पुरवते तेव्हा ती मोफत पुरवली जाते. तर, ज्यांना झेड किंवा झेड प्लससारखी जास्त सुरक्षा घराभोवती किंवा प्रवासादरम्यानही पुरवली जाते तेव्हा सुरक्षा यंत्रणेतील व्यक्तींच्या राहण्याची सोय त्या व्यक्तीलाच करावी लागते.


हेही वाचा :  परिवहन मंत्र्यांनी दिला मेस्मा लागू करण्याचा इशारा, मेस्मा कायदा म्हणजे काय? आणि कधी लावण्यात येतो हा कायदा?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!