Just another WordPress site

Republic Day 2022 :१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला राष्ट्रध्वज फडकावण्याची भिन्न पद्धत, पण का? आणि नेमका फरक काय?

२६ जानेवारी हा आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन. याच प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून देशवासियांनी राष्ट्रध्वज फडकावला. काही ठिकाणी पालकमंत्र्यांनी, काही ठिकाणी राज्यपालांनी, तर काही ठिकाणी लष्कराने आपापल्या पद्धतीने राष्ट्रध्वज फडकवला. दिल्लीत राष्ट्रपतींनी तर महाराष्ट्रात मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांनी तिरंगा फडकावला. मात्र,  पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी ध्वज का फडकावला नाही? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये काय फरक आहे? याविषयी जाणून घेऊ. 


हायलाईट्स

१. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान तर प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती फडकवतात ध्वज 

२. प्रजासत्ताक दिनी लष्करी आणि सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवलं जातं

३. प्रजासत्ताक दिनी सगळे कार्यक्रम राजपथवर आयोजित केले जातात

४. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अन्य देशातील प्रमुखांना आमंत्रित करतात

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, तर २६ जानेवारी १९५०  रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले आणि भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या दोन्ही राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जातो. मात्र,  दोन्ही प्रसंगी ध्वज फडकावण्याचे नियमही वेगळे आहेत. 


ध्वज फडकावणारी व्यक्ती 

१५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून लाल किल्ल्यावरूनच ते देशाला उद्देशून भाषण करतात. तर २६ जानेवारीला देशाचे राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात.  याचं कारण म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आलेलं नव्हतं. कारण तेव्हा देश प्रजासत्ताक नव्हता. राज्यघटनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे  १५ ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी देशानं राज्यघटनेचा अंमलात आणली.  देश प्रजासत्ताक झाला आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद अस्तित्वात आलं. त्यामुळे २६ जानेवारीला राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात.


राष्ट्रध्वजाची जागा 

स्वातंत्र्यदिनी तिरंगा दांडीला खाली बांधलेला असतो. तो खालून दोरीने खेचून वर आणला जातो. नंतर तो फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात.  स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या यशाचं द्योतक म्हणून या दिवशी ध्वज खालून वर चढवला जातो. याऊलट  २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी बांधलेला असतो आणि तो फडकवला जातो. त्यामुळे या प्रक्रियेला झेंडा फडकविणे असे म्हणतात. 


ध्वज फडकावण्याचं ठिकाण

स्वातंत्र्यदिनी सर्व मुख्य कार्यक्रम लाल किल्यांवर आयोजित केले जातात. तर प्रजासत्ताकदिनी सर्व कार्यक्रम राजपथवर आयोजित केले जातात.


कार्यक्रमांमधील फरक काय?

प्रजासत्ताक दिनी देशाच्या लष्करी सामर्थ्याची आणि सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवलं जातं. तसेच देशवासियांसमोर निवडक राज्यांकडून चित्ररथाचं पथसंचलन केलं जातं. तर स्वातंत्र्यदिनी असा कोणताही सोहळा नसतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतर देशातील प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोणत्याही पाहुण्याला आमंत्रित केलं जात नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!