Just another WordPress site

Ramesh deo pass away : सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांचे पुत्र आणि चित्रपट अभिनेते अजिंक्य देव यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या काही दिवसांपासून रमेश देव आजारी होते. अखेर आज  वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. चारच दिवसांपूर्वी म्हणजे, ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. दरम्यान,  त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.


हायलाईट्स

१. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन

२. वयाच्या ९३ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

३. रमेश देव यांच्या निधनाने सिने सृष्टीवर शोककळा

४. ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता 


रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापुर येथे झाला. त्यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठं योगदान दिल्याने कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केलं. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झाले. रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते. रमेश देव यांनी १९५१ साली पाटलाची पोर या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नंतर १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना पहिलाच राजश्री प्रोडक्शनचा १९६२ साली आरती  सिनेमा मिळाला आणि त्यांनी  या सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं.  १९६२ मध्ये यशाच्या शिखरावर असतांना रमेश देव यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सीमा देव यांच्या सोबत काम केले.  या चित्रपटावेळीच दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. नंतर कशाचाही उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं.  या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुले आहेत. पुढं  सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ या चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. ‘आनंद’  आणि ‘ताकदीर’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांना वेगळी ओळख निर्मान करून दिली. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास २८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आपल्या  प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच  त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.  चित्रपटा शिवाय त्यांनी अनेक नाटके आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २००६ साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या स्टार्ससोबत काम केले. त्यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती करून छोटा पडदा आणि रंगभूमीवरही आपला काळ गाजवला. त्यांच्या सिने सृष्टीतील योगदानाची दखल घेऊन २०१३ साली रमेश देव यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.  त्यांच्या जाण्यानं सिने सृष्टीवर मोठा दु:खांचा डोंगर कोसळला. 











Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!