Just another WordPress site

टोमॅटोच्या दरापुढे पेट्रोल स्वस्त! महागाईवरून ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

uddhav thackeray On Modi : पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) ‘परवडले’ एवढी टोमॅटोची भाववाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरापुढे पेट्रोल स्वस्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या जेवणातून गायब झालेला टोमॅटो सोशल मीडियावरील मिम्स, रील्स, व्हॉटस्अप मेसेज यावर दिसत आहे. ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की, ‘स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा ? अशा कात्रित सामान्य माणूस सापडला आहे, असे सांगत ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Petrol cheaper than the price of tomatoes Thackeray group attacked Modi over inflation)

पेट्रोलच्या दरवाढीबद्दल हे कच्च्या तेलाच्या जागतिक दरवाढीकडे बोट दाखवितात. मग, जेव्हा हे जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत? या प्रश्नावर नेहमी हात वर करतात. तीच गोष्ट जीवनावश्यक वस्तू तसेच डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला-फळफळावळ यांच्या दरवाढीची. या दरवाढीसाठी ते कधी कमी उत्पादनाकडे बोट दाखवितात, तर कधी नैसर्गिक परिस्थितीच्या नावाने बोटे मोडतात. मग तुमची जबाबदारी आणि काम काय ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आला आहे.

महागाईचे खापर तुम्ही कधी यावर तर कधी त्यावर फोडणार असाल तर सरकार म्हणून तुमचा जनतेला काय फायदा ? आता टोमॅटो १५० रुपयांवर पोहोचला, तर त्याचेही खापर पावसावर फोडत आहात. कांद्याबाबतही वर्षानुवर्षे हेच होत आले आहे. कधी कांद्याचे दर एवढे कोसळतात की, शेतकऱ्याला तो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. कधी तो महाग होतो; परंतु ना कांदा उत्पादकाला लाभ होतो ना सामान्य जनतेला. तो होतो दलाल आणि व्यापाऱ्यांना, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

‘महंगाई डायन’ सामान्यांच्या मानगुटीवर
महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणाँ करीत मोदी सरकार २०१४मध्ये सत्तेवर आले. मागील नऊ वर्षे सलग त्यांचीच केंद्रात सत्ता आहे, पण महागाई आणि दरवाढीबाबत स्थिती काय आहे? वास्तव हेच आहे की, मोदी राजवटीतही ना दरवाढ थांबली आहे, ना महागाई लपून बसली आहे. नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील निर्णयांचे ढोल तुम्ही सर्वत्र पिटत आहात. मग या नऊ वर्षांनंतरही ‘महंगाई डायन’ सामान्यांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव का घेताना दिसत नाही? असे प्रश्नही ठाकरे गटाने केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!