Just another WordPress site

पंकजा मुंडेंना पुन्हा डच्चू! चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड

भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे.

गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चित्रा वाघ यांना ही मोठी जबाबदाऱी दिल्याने पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावललं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करणे असो, त्यांना प्रत्युत्तर देणे असो, तसेच राज्यातील महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यात चित्रा वाघ या अग्रेसर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाघ यांना निवडीचे पत्र दिले. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत. अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा चहाच्या टपरीवरील एक व्हिडीओ व्हायर झाला होता. यावेळीही त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली. तुमच्या राजकारणात कोणी जास्त चहापावडर टाकून ते कडवट करतंय का? असंही पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा प्यायचा. जे आपल्या वाट्याला येते, त्याची चव आपल्याप्रमाणे बदलून घ्यायची असते. ताटात काही चांगले पडले नाही, तर मी किरकिर करत नाही. मीठ कमी असेल तर लोणचं तोंडी लावण्यासाठी घेते. तिखट कमी असेल तर चटणी खाते, तसंच जीवनातही काही कमी पडलं तर त्याची चव नीट कशी करायची हे मला माहित आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप मध्ये त्यांना डावललं जात आहे यावर सूचक वक्तव्यं केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!