Just another WordPress site

आता सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्याला फोन किंवा मेसेज केल्यास बसेल १ लाखांचा दंड, काय आहे हे नवीन धोरण?

अनेक कर्मचारी सुट्टीचा दिवस निवांत, कुटुंबासह घालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सुट्टीच्या दिवशी ऑफिसचा कॉल किंवा SMS नको वाटतो. एका कंपनीनं कर्मचाऱ्यांची ही भावना ओळखलीच नाही तर जपण्याचा प्रयत्न केलाय. स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण धोरण आखलंय. त्यानुसार, कर्मचारी सुट्टीवर असेल तर त्या दिवशी कामासंबंधी त्याला कुठलाही कॉल अथवा एसएमएस करता येणार नाहीये. दरम्यान, हे धोरण नक्की आहे तरी काय? याच विषयी जाणून घेऊ.

तुम्ही कामाप्रति कितीही प्रमाणिक असलात तरी सुट्टीच्या दिवशी ऑफिसचा फोन किंवा मेसेज प्रत्येकला नकोच असतो. पण काही कंपनीमध्ये सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला नेहमी ऑफिसच्या ग्रुपवर ऍक्टिव्ह राहावं लागतं. शिवाय, लागेल ते काम करावं लागतं, अशी अपेक्षा केली जाते. यापेशा गंभीर बाब म्हणजे, तुमच्या कंपनीच्या मालकाला, बॉसला यात वावगं असं काहीच वाटत नाही. अशी लोकं उलट, तुम्ही सुट्टी घेताय म्हणजे काहीतरी चूक करताय असं भासवतात. खरंतर रजेवर असताना ऑफिसमधून फोन, ई-मेल किंवा मेसेज आला की कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढते. आजकाल तर नोकरीतील ताणतणाव, कामाचा लोड या सगळ्या कारणांमुळं अनेकांना समस्यांना कर्मचाऱ्यांना तोंड द्यावं लागतं. आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काही कंपन्यांनीदेखील सकारात्मक पावलं उचलण्यास आताशा सुरूवात केलीये. स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रिम ११ या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक खास पॉलिसी तयार केलीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

ड्रीम ११ कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी Dream 11 Unplug ही पॉलिसी आणलीये. त्यानुसार, या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कंपनीकडून कोणताही फोन किंवा मेसेज करून त्रास दिला जाणार नाही. जर कंपनीतील कोणी एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टीच्या दिवशी फोन किंवा मेसेज करून त्रास दिला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता यावा, यासाठी या कंपनीने हे नवीन धोरण घोषित केलंय.

या नव्या धोरणाची माहिती कंपनीनं Linkedin वर पोस्ट करत दिलीये. या धोरणामुळे सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून अथवा सिनिअर सहकाऱ्याकडून कोणताही त्रास होणार नाही. कार्यालयाकडून कॉल, ई-मेल, मॅसेज अथवा व्हॉट्सअपवरुन कामाची विचारणा करण्यात येणार नाही. कंपनी Dream ११ ने Unplug या धोरणाची घोषणा करुन थांबली नाही तर याविषयीची कडक अंमलबजावणीही करणार असल्याचं सांगितलं. ड्रीम ११ कंपनीचे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी Dream 11 Unplug या पॉलिसीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, अनप्लग काळात जर कर्मचाऱ्याच्या अन्य कर्मचाऱ्याने कामासंबंधीत फोन अथवा मेसेज केला तर त्याला एक लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. ड्रीम ११ मध्ये आम्ही कर्मचाऱ्यांचे हितरक्षण करत असल्याचा दावा कंपनीनं आपल्या पोस्टमध्ये केलाय.

दरम्यान, अनेकदा कर्मचारी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अशा ठिकाणी जातात तिथं नेटवर्कची समस्या असते. अशावेळी त्यांच्या मनावर ऑफिसचे कॉल आणि मेसेजला उत्तर देण्यासाठी दबाव असतो. मात्र, ड्रिम ११ चं हे नवीन धोरण कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या धोरणामुळे सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कुठलाच त्रास होणार नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!