Just another WordPress site

अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला, दिवाळी तुरूंगातच

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे अनिल देशमुखांची यंदाची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुनच सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने या प्रकरणातही जामीन मिळावा अशी याचिका अनिल देशमुख यांच्या वतीनं करण्यात आली होती. याच जामीन अर्जावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुखांची यंदाची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाने अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीच्या प्रकरणात जामीन अर्ज मिळाल्यानंतर सीबीआयच्या प्रकरणातही त्यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे.

अनिल देशमुखांच्या विरोधात सीबीआयकडे भक्कम पुरावे असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणं हा भ्रष्टाचाराचाच एक प्रकार असल्याचं सीबीआयने न्यायालयाला सांगितलं. सचिन वाझे यांच्या साक्षीकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, या प्रकरणात सार्वजनिक पैसा, देशाचा पैसा हा चुकीच्या कामांत वापरला गेल्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सीबीआयने केला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १ नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!