Just another WordPress site

N D ptil : ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील  यांचे आज वृद्धापकळाने निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होते.


हायलाईट्स

१. शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन 

२. वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

३. एन.डी. पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा

४. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी 


वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एनडी पाटील यांच्या  निधनाच्या वृत्तानंतर परिवर्तनवादी चळवळीतील अनेकांसह राज्यातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते म्हणून प्रा. एन. डी .पाटील यांना ओळखलं जातं होतं. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.  प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च  केलं. १५ जुलै १९२९ रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं जन्मलेल्या एन डी पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राला ते एन डी पाटील याच नावानं परिचित होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर, राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत त्यांनी मजल मारली. तब्बल १८ वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.  याशिवाय, भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना सन  १९९८  ते  २००० या काळात काम केलं.  राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात १९९९ साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांना मोठा आधार वाटे. एन. डी. पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्यानं आवाज उठवत. त्याशिवाय, लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.  प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कारांसह अन्य पुरस्कारांनी  देखील गौरवण्यात आलं होतं.  शिवाजी विद्यापीठ,  स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना  डी.लीट. देऊन सन्मानीत केले होते. एन. डी. पाटील यांनी गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली असून दुर्लक्षित-वंचित घटकाचा आवाज हरवल्याची भावना व्यक्त होते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!