Just another WordPress site

Modi : यूट्यूब सबस्क्राइबर्समध्ये मोदींचा डंका, अनेक नेत्यांना टाकलं मागे, पाहा टॉप फाईव्ह मध्ये कोणाचा समावेश?

गेल्या दिडेक वर्षापासून कोरोना असल्यानं अनेकांच्या हाताला काम नाही. अनेकांचे रोजगार गेलेत. तर, यातीलच काही जणांनी कोरोनाला संधी मानून स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरू करून पैसे कमवायला सुरूवात केली. आपल्या अंगातील पाककौशल्य असो किंवा कलागुण असो. त्याचे व्हिडिओ लोक YouTube वर अपलोड करून हिट व्हायला लागले. जिथे सामान्य माणूस हिट होऊन जातो, तिथे नेतेमंडळी तरी कशी मागे राहतील? दरम्यान, युट्यूबवर कोणत्या नेत्याचे किती सबक्राईबर्स आहेत? YouTube वर सबक्राईबर्सच्या यादीत कोणता नेता अव्वल कोण आहे? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.


हायलाईट्स

१. यूट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच चर्चा

२. मोदींचे यूट्युब सबस्क्रायबर्स एक कोटींपेक्षा जास्त

३. २००७ साली मोदींनी यूट्यूब चॅनेल सुरु केलं होतं 

४. राहुल गांधींच्या सबस्क्राइबर्सची संख्या ५.२५ लाख


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे  YouTube चॅनेल हिट ठरले असून नुकताच त्यांच्या चॅनेलने तब्बल १ कोटी सब्सक्राइबर्सचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे जगभरातील नेत्यांमध्ये ते पहिले पंतप्रधान आहेत की, ज्यांनी १ कोटींचा टप्पा पार केला आहे. मोदींनंतर, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हे यूट्यूबवर सर्वाधिक सब्सक्राइबर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या चॅनलचे ३६ लाख सबस्क्राइबर्स आहेत. तर मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे ३०.७ लाख सब्सक्राइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.  त्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आणि बलाढ्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा नंबर लागतो.  ज्याकाळात नुकतेच मोबाईल फोन बाजारात येऊ लागले होते, त्याकाळात मोदींनी आपले पहिले YouTube चॅनल सुरु केलं होतं.२६ ऑक्टोबर २००७ साली मोदींनी YouTube चॅनेल सुरु केलं. मात्र आपला पहिला व्हिडिओ तब्बल ४ वर्षानंतर म्हणजे २०११ साली अपलोड केला होता. हा व्हिडिओ गुजरातमध्ये सादर केलेल्या बजेटबद्दल होता. मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण १५ हजार ४७७ व्हिडिओ अपलोड झाले आहेत. यातील बहुतेक व्हिडिओ मन की बात, पंतप्रधानांचे लाईव्ह कार्यक्रम किंवा भाषणे यांच्याशी संबंधित आहेत. मात्र लोकांची  सर्वाधिक पसंती मिळाली आहे ती दिव्यांग व्यक्तीसोबतच्या भेटीची. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती मोदींशी संवाद साधते आणि त्यानंतर मोदींचे आशीर्वाद घेते. १९ फेब्रुवारी २०१९ साली हा व्हिडिओ टाकण्यात आला होता. हा व्हिडिओ केवळ १४ सेकंदांचा असून या व्हिडिओला ७ करोड लोकांनी बघितलं. आणि ११ लाख लोकांनी तो व्हिडिओ लाईकपण केला.  मोदींच्या चॅनेलला एकूण १, ६४६, ०५५, ६७९  व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, मोदींशिवाय, देशातील नेते देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर फेमस आहेत. भारतातील इतर लोकप्रिय राजकारण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा देखील युट्यूब चॅनेल आहे.  त्यांच्या सबस्क्राइबर्सची संख्या सध्या ५.२५ लाख आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या युट्यूब सबस्क्राइबर्सची संख्या राहुल गांधींपेक्षा कमी आहे. त्यांच्या चॅनेलवर ४.३९ लाख सबस्क्राइबर्स आहेत.  तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी ३.७३ लाख, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम चे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे २.१२ लाख सबस्क्राईबर्स आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचा देखील युट्यूब चॅनेल असून त्यांच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राइबर्सची संख्या १.३७ लाख आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी सोशल मीडिया हँडल करणारी टीम प्रचंड सक्रीय आहे. यामुळे पंतप्रधानांशी संबंधित महत्त्वाची माहिती तसेच देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी दिलेली प्रतिक्रिया याबाबतची माहिती भारतासह जगभरातील नागरिकांना सोशल मीडियावरून सहज आणि लवकर उपलब्ध होते. सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान थेट जनतेच्या संपर्कात राहतात. हा जनसंपर्क त्यांची लोकप्रियता वाढवण्यामागील एक प्रमुख कारण आहे. दरम्यान, आज एकूणच देशात मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनता एकत्र आली आहे. आज कोणत्याही  सोशल मीडियावर आपण गेलो की त्यावर मोदींची थट्टा करणारे मिम्स फिरत असतात. जगभरातील नेत्यांमध्ये मोदींनी जरी नंबर पटकवला असला तरी त्यांना देशात विरोध होतच आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!