Just another WordPress site

Marathi Language Day : तात्या, तुम्हाला वंदन करून.. – मधुकर भावे

Marathi Bhasha Gaurav Din : आज मराठी भाषा दिन…  मराठी भाषिकांचे राज्य होण्यासाठी सलग ५ वर्षे केवढा प्रचंड मोठा लढा करावा लागला…. नवीन पिढीला याची माहिती नाही. एका प्रचंड आंदोलनातून आणि १०६ जणांच्या बलिदानातून मराठी भाषिकांचे राज्य मिळाले. १ मे हा दिवस त्यामुळेच मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तरी दसरा-दिवाळीसारखा हवा. आणि आता २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिन’ हा दिवसही असाच सणासारखा दिवस असेल… पण, सण एकाच दिवशी साजरा करतात. मराठी भाषा दिनाचे तसे होऊ नये. एक दिवसाकरिता ‘दिन’ साजरा करताना राहिलेल्या ३६४ दिवसांत मराठी भाषेची अवस्था ‘दीन’ होऊ नये. सुरेश भट यांनी छान गीत लिहिले-

‘लाभले भाग्य आम्हा…

बोलतो मराठी’

कुसुमाग्रजांनी त्याच्याही आगोदर मंत्र्यालयासमोर उभी असलेली फाटक्या वस्त्रातील मराठी… तापलेल्या निखाऱ्यासारखी कविता लिहिली. त्यानंतर मराठी भाषा दिन सुरू झाला. आज विधानसभाही अधिवेशनही सुरू… त्यामुळे उद्या हा भाषा दिन… कोणत्या गोंधळात साजरा होईल, सांगता येणार नाही. एका अर्थाने हा दिवस सरकारी ठरू नये… कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण मराठी भाषेचाच जयजयकार करतो आहोत… ज्या कविच्या शब्दां-शब्दांत स्फुलींग होते त्या त्यांच्या शब्दांनीच १९४२ च्या क्रांतीचे ते गीत साकार झाले होते.

गर्जा जयजयकार क्रांतीचा

गर्जा जयजयकार…

आम्हा पत्रकारांना केवढा अभिमान आहे की, ही कविता लिहिली गेले तेव्हा कुसुमाग्रज हे पुण्याच्या प्रभात दैनिकात उपसंपादक होते. कुसुमाग्रज या नावाने कविता छापून आली. दुसऱ्या दिवशी प्रभात कार्यालयावर पोलिसांची धाड पडली…. ‘कोण कुसुमाग्रज…’ संपादक खात्यात बसलेली सर्व मंडळी विचारू लागली… ‘कोण रे कुसुमाग्रज…’ खुद्द तात्या बसले होते… त्यांनाही पोलिसांनी विचारले, ‘कुसुमाग्रज कोण?’ संपादक खात्यातील आणि अन्य खात्यातील सगळी नावे तपासली… कुसुमाग्रज हे नाव कुठेच नाही. पण संपादकांवर धाड  आली.  संपादकांनी सांगितले की, ‘ कोणीतरी टपालाने कविता पाठवली होती ती आम्ही छापली… ते पत्र कुठे आहे, माहीती नाही…’ प्रभात चे संपादक म्हणजे लहान-सहान कोणी नव्हते. श्री. वालचंद कोठारी… हा काही मराठी भाषिक माणूस नाही. पण, मराठीच्या अभिमानाने मराठी अभिमानी लोकांपेक्षाही अधिक वालचंदसाहेबांनी त्यांचे प्रभात दैनिक महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी सर्वस्व पणाला लावून वापरले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईतील ‘नवाकाळ’, पुण्यातील ‘प्रभात’ ही दोन दैनिके आणि आचार्य अत्रे यांचे साप्ताहिक ‘नवयुग’हेच महाराष्ट्राच्या प्रचाराचे मोठे साधन… बाकी सर्व मराठी-गुजराथी पत्रे विरोधात….

त्या काळात कुसुमाग्रज प्रभातमध्ये होते. त्याच काळात त्यांचा ‘विशाखा’ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. मराठीमध्ये कुसुमाग्रजांनी एकच काव्यसंग्रह लिहिला असता तरी ते कवी म्हणून ते दिगंत झाले असते… ‘क्रांतीचा जयजयकार’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आिण ‘कोलंबसाचे गर्वगीत’, ‘मातीची दर्पोक्ती’, ‘अहीनकुल’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ एवढ्याच कविता कुसुमाग्रजांनी लिहिल्या असत्या तरी दहा कवितासंग्रहांचा ऐवज असल्यासारख्या या कविता आहेत. अशा या कुसुमाग्रजांच्या जयंतीला मराठी भाषा दिन आपण साजरा करत आहोत. पण मराठीची अवस्था दयनीय का होत चालली आहे,  याचे चिंतन आपण करणार आहोत की नाही? जे मराठी राज्य एका प्रचंड लढ्यातून अभे राहिले, तो लढा लढवला कोणी… कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी त्यात श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय किती होते…  आणि आज ६५ वर्षे व्हायला आल्यानंतर ज्यांनी सर्वस्व पणाला लावून लढे लढवले… मराठी भाषेचे राज्य निर्माण झाले… तो लढा लढवणारा कामगार आिण शेतकरी नेमका कुठे आहे? त्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नोकरी भेटते आहे का? ती नोकरी मिळत असेल तर त्यांचा पत्ता कोणता? गेल्या ६५ वर्षांत सरकार कोणाचेही असो… मराठी दयनीय का झाली? मराठी चित्रपट दाखवणारी चित्रपटगृहे मग भारतमाता असेल… हिंदमाता असेल… बंद का पडली? कोणी पाडली? भव्य मॉलमधील मिनी थिएटरमध्ये २०० रुपयांचा पॉपकॉर्न खावून चित्रपट बघणाऱ्यांमंध्ये मराठी भाषिक किती? मॅक्डोनॉल्डमध्ये जाणारे मराठी भाषिक किती? मामा काणे यांचे मराठी हॉटेल क बंद पडले? तांब्यांनी त्यांचे हॉटेल उड्प्यांना चालवायला का दिले? गिरगावातील विरकर यांचे हॉटेल का बंद पडले? किरण शांताराम प्लाझा कसे-बसे चालवले आहे… मराठी राज्यात इतर भाषिक मालक असलेल्या मॉलमधील चित्रपटगृहांत मराठी चित्रपट दाखवण्याची सक्ती करावी लागते… महाराष्ट्रात मराठीची सक्ती… हे दिवस का आले? उद्योग-धंद्यांत मराठी माणूस पुढे का नाही? चौगुले यांची कोकण सेवक बोटसेवा का बंद पडली? कोकणातील सर्व बंदरांमध्ये गाळ साठल्यानंतर सुखाचा आणि स्वस्तातली जलप्रवास बंद पडण्याची व्यवस्था कुणी केली? हा गाळ काढावा, स्वस्तातला जलप्रवास चालु करावा, असे कधीच कोणाला का वाटले नाही…. एकेकाळचे प्रख्यात मराठी उद्योजक किर्लोस्कर, गरवारे, चौगुले यांच्या उद्योगांचे काय झाले? ते तोट्यात का गेले? बजाज फायद्यात का गेला? एकूणच मराठी माणूस… मराठी उद्योग यांची पिछेहाट का झाली? मराठीचा अभिमान जरूर ठेवा… तो ठेवलाच पाहिजे. कारण ज्ञाानोबा-तुकोबा-विनोबा यांची ती भाषा आहे. पण, या भाषेचा अभिमान बाळगणारे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आग्रहाने घालतात… मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली. शहरातील तर बहुसंख्य मराठी शाळा बंद पडल्या. ग्रामीण भागात शाळा आहेत… शिक्षक नाहीत… त्यांना पगार नाहीत… सुविधा नाहीत… क्रिडांगणे नाहीत… सगळ्या बाजूंनी मराठीची अशी कोंडी कोणी केली? कशी केली?

एकेकाळी ज्ञाान-विज्ञाानात महाराष्ट्र आघाडीवर होता. रघुनाथराव माशेलकर, जयंतराव नारळीकर, विजय भटकर, वसंतराव गोवारीकर… विज्ञाान आणि तंत्रज्ञाानात मराठी शास्त्रज्ञ आघाडीवर होते. आजही आपले हे शास्त्रज्ञ नामांकित मानले जातात. पण, पुढच्या पिढीचे काय? ती नावे कोणती? चंद्रयान किती दिमाखात चंद्रावर उतरले… जगाने कौतुक केले… नासाने कौतुक केले… पंडीत नेहरू यांचेही केले.. विक्रम साराभाई यांचेही केले.. आणि चंद्रयान निर्मितीमधील १३० छोट्या घटकांपासून सर्वांच्च तंत्रज्ञाांपर्यंत सर्वांचे कौतुक झाले… ती यादी प्रसिद्ध झाली. पण दुर्दैवाने यात एकही मराठी नाव वाचायला मिळाले नाही. हा मराठीच्या प्रादेशिक अभिमानाचा विषय नाही. जागतिक पातळीवरही नामांकनामध्ये जगाच्या जागतिक विद्यापीठात नामांकित यादीत भारतातील एकही विद्यापीठ नसावे… महाराष्ट्रातीलही एकही विद्यापीठ नसावे… ही अशी घसरण का होत आहे… कशामुळे होत आहे… आपण सर्वच क्षेत्रात कमी का पडत आहोत… याचे चिंतन करायचे कोणी? आजच्या राजकारणात यासाठी कोणाला वेळ आहे का?… हा विषय समजण्याची कुवत असलेले कितीजण आहेत? सगळ्याच आघाड्यांवर महाराष्ट्र का मागे पडतोय… शेतकऱ्यांचीच आणि कामगारांचीच का गळचेपी होतेय… एकर-दोन एकर कोरडवाहू शेतकऱ्याला आत्महत्या का कराव्या लागत आहेत… कोणालाही याचे काहीही पडलेले नाही. आत्महत्या करणारा शेतकरी मराठी आहे, म्हणून हे लिहित नाही… या महाराष्ट्रात राज्य निर्माण करण्यासाठी लढलेल्या शेतकऱ्यावर ही वेळ का आली…  केवळ मराठी भाषा दिन साजरा करून किंवा एक दिवसासाठी मराठीचा सन्मान करून या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही… महाराष्ट्राची बांधणी करणाऱ्या शेवटच्या घटकाला आपण मराठी आहोत, याचा अभिमान वाटेल असे दिवस त्याच्या आयुष्यात आल्याशिवाय केवळ भाषेचा जयजयकार हा त्याच्यासाठी पुरेसा नाही.

सूर्य खूप प्रकाशमान आहे. पण त्याचा प्रकाश माझ्या घरात आला नाही तर त्याचा मला काय उपयोग आहे? आज गरीब मराठी माणसांची तीच अवस्था आहे. ही अवस्था का झाली? मराठी माणूस धंद्यात यशस्वी का होत नाही? व्यापार-उदीम मराठी माणसांच्या हातात का टिकत नाही… आमच्या मराठी हॉटेलमधील भजी, पोहा, लोकप्रिय का नाही झाली? मराठी घरांत शनिवार-रविवार इडली, वडा, डोसा, उतप्पा या पदार्थांची सवय का लावली… कोणी लावली? जी महामार्गावरील हॉटेल ‘मिसळ’ची  जाहिरात करून या मिसळीला सध्या बरे दिवस आले आहेत. तो मूळ मराठी असलेला पदार्थ आज महामार्गावरील ज्या हॉटेलात विकला जातो… ती हॉटेल कोणाची आहेत? अनेक आघाड्यांवर आपण अशसस्वी होतो आहोत… व्यवसायातील चिकाटी, श्रम यात आपण कमी पडत आहोत का? फुटपाथवर दुकान टाकून बसलेल्या सगळ्यांची जनगणना करा… यात मराठी तरुण किती आहेत? एकदा आकडा सांगा…  बाकी नावे सांगत नाही… सॅण्डवीच विकणारे स्टॉल कोणाचे आहेत मोजा… एकदा पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत रस्त्याने चला… रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध फळांचे रस (ज्यूस) विकणारे कोण आहेत? तपासून घ्या… पाच मराठी तरुण दिसले तर मी ते तरुण दाखवणाऱ्यांचा सत्कार करीन…

परवा जयसिंगपूरला जाताना दोन ज्यूस सेंटरवर थांबलो… एक आहे बरेलीचा… दुसरा आहे जोनपूरचा… हे सर्व ठिकाणी असेच आहे. त्याने काय सांगावे, ‘कुछ दिन में गाव जानेवाला हू… ये जगह बेचके जाएगा…’ जागा कुणाची… रस्ता कुणाचा… त्याच्या नावावर जागा करून दिली का? कशाचा कशाला पत्ता नाही…. त्यांना काय सांगावे… ‘ये जगह बेच गया…. तो पाच लाख तो मिलेंगे…’ सी.एस.टी. च्या चौकात एक सॅण्डवीचवाला आहे… ती जागा महापालिकेची आहे… तिथे त्याचा स्टॉल… त्याने त्या जागेचा हक्क सोडून दुसऱ्याला स्टॉल दिला तर मुंबईत असे स्टॉल २०-२० लाखांना विकले जातात. आिण यात एकही मराठी तरुण नाही.

तेव्हा मराठी भाषा दिन साजरा करताना असंख्य प्रश्नांवर चिंतन करून निर्णय करावे लागतील… उद्योगामध्ये मराठी तरुणाला आणावे लागेल… कोणतीही नोकरी करताना किती दांड्या मारायच्या…. कोणाच्या मातीला कितीवेळा जावे… मराठी तरुणांनी याचाही एकदा निर्णय करावा…

प्रख्यात उद्योगपती सेठ लालचंद हिराचंद यांची एकदा मी ‘मराठा’साठी मुलाखत घेतली होती. त्यावेळी शिवसेनेने तरुणांना वडा-पावचे स्टॉल देवून व्यवसायाची सवय लावली होती. स्थानिक लोकाधिकार समितीचे सुधीरभाऊ जोशी आणि गजाभाऊ किर्तीकर यांनी चांगले काम सुरू करून मराठी तरुणांना कुठे-कुठे नोकऱ्या देता येतील ही चळवळ हातात घेतली होती. चांगले काम होते. त्याचवेळी अत्रेसाहेब मला म्हणाले की, ‘मराठी तरुण मागे का पडतात.. यावर दोन-तीन मुलाखती तयार करा…’  म्हणून मी सेठ लालचंद हिराचंद यांना फोन केला… त्यांनी घरी बोलावले… स्वागत केले.. चांगली मुलाखत दिली. लतादीदींच्या पुढच्याच बिल्डींगमध्ये ते राहात होते. त्यांनी सांगितलेले दोन महत्त्वाचे मुद्दे आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

ते म्हणाले होते, ‘आम्ही व्यवसायात यशस्वी होतो, याचे कारण एक रुपया भांडवल आम्ही घातले तर त्या दिवशी त्याचा संध्याकाळी सव्वा रुपया झालाच पाहिजे… यासाठी चिकाटीने आम्ही काम करतो… रुपयाचा सव्वारुपया मिळवणे हे व्यवसायाचे यश आहे. मराठी माणूस त्याला नफा कमावणे म्हणतो… नफा कमावणे म्हणजे काहीतरी पाप आहे… अशी मराठी माणसांची भावना आहे… ‘नफेखोर’ हा शब्द मराठी माणसांनी तयार केलेला आहे. आणि तो शिवीसारखा वापरला जातो…  आम्ही नफा कमावण्यात पाप मानत नाही. खोटं काम करण्यात पाप आहे. मराठी माणसांमधील सगळ्यात मोठा दोष त्यांना नफा कमवण्यात कमीपणा वाटतो… ’

मुलाखत खूप मोठी होती… मराठामध्ये ती विस्तृतपणे प्रसिद्ध झाली. त्यांच्या फोटोसह… अत्रेसाहेबांना त्यांनी फोनही केला… मराठा कार्यालयात नंतर ते साहेबांना भेटायलाही आले…

मला असे वाटते की, मराठी उद्योगपतींनी तरुण मराठी माणसांच्या मनात काय न्यूनगंड आहेत… नोकरीच्या मागे तरुण का धावत आहेत… व्यवसायाच्या यशासाठी ते का कमी पडत आहेत… याचा अभ्यास केला पाहिजे… ही सगळी दुखणी दूर करायची असतील तर एक दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करून याची उत्तरे मिळणार नाहीत… एका दिवसासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ३६४ दिवस मराठी भाषेची ‘दीन’ अवस्था… यातून बाहेर पडल्याशिवाय महाराष्ट्र राज्य ज्या उद्देशाने स्थापन झाले ते उद्देश कधीही साध्य होणार नाहीत. मुंबईत मराठी माणसांची संख्या अल्पमतात गेलेली आहे. मुंबई महापालिकेत आता नगरसेवक नाहीत… पण नगरसेवक जेव्हा होते तेव्हा मराठी नगरसेवकांची संख्या ४५ टक्के होती. आणि ५५ टक्के बिगर मराठी नगरसेवक होते. आज सगळी शहरे आणि त्यातील बाजार हे बिगर मराठी माणसांच्या हातात चाललेले आहेत. मुंबईचे लचके तोडले जात आहेत. मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईचे लचके तोडून मुंबईचे वैभव संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीत मराठी माणसाला वैभवाचे दिवस येणे अवघड आहे.

उभे राहणाऱ्या उंचच उंच इमारतीमध्ये किती मराठी माणसांचे फ्लॅट आहेत? ज्या जाहिराती आहेत… त्या टू बी. एच. के.  आता दीड कोटी च्या पुढे…. आणि थ्री बी.एच. के. चार कोटीच्या पुढे…. किती मराठी माणसांना हे परवडणारे आहे…? शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करणारा गरिब मराठी शेतकरी आणि हजारो कोटी रुपये बुडवणारे उद्योगपती आणि त्याबद्दल मिजास बाळगणारी त्यांची वृत्ती यातील फरक दूर झाल्याशिवाय मराठी भाषा दिन साजरा करून  मराठी माणसांचे दैन्य दूर होणार नाही.

शेवटी एकच… आमच्या बोलण्यात पदोपदी इंग्रजी शब्द आहेत. परवा एका मित्राला घाईत असताना विचारले, तो म्हणाला की, ‘मम्मीला अॅक्सीडंट झाला… सिरिअस आहे… अॅडमीट आहे.. आयसीयूमध्ये आहे. उद्या ऑपरेशन आहे..’ आता यात मराठी शब्द किती? आमची भाषा समृद्ध कशी होणार… ज्ञाानभाषा किंवा अभिजात भाषा कशी होणार… इंग्रजीत २६ मुळाक्षरे आहेत. मग ती भाषा ज्ञाानभाषा होऊ शकते… आणि आम्ही ती भाषा सहज घराघरात वापरतो… मग २६ मुळाक्षरांची मराठी कुठे आणि का कमी पडते? याची उत्तरे कोण देणार? मराठी भाषेतील मूळ मराठी शब्द किती? त्याची यादी एकदा तपासा…  सध्या एवढेच…

– मधुकर भावे 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!