Just another WordPress site

तुतारी, मशाल, हात… ‘वंचित’ची घ्या साथ… मग सगळं जमतंय बघा…

श्री. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले आहे. काही प्रसंग असे असतात की, सहज तोंडून शब्द येतात- ‘झाले ते बरेच झाले…’ चांगल्या गोष्टीसाठीच आगोदर खटकलेल्या घटना घडत असतात. पूर्वीच्या ‘घड्याळ’ चिन्हापेक्षा ‘तुतारी’ चिन्ह हे कितीतरी पटीने चांगले चिन्ह आहे. शिवाय मतदार आता खूप शहाणा झालेला आहे. २४ तासांत महाराष्ट्राच्या घराघरांत पवारसाहेबांच्या पक्षाचे नवे चिन्ह नुसतेच समजले नाही तर, चांगले निनादलेले आहे. ‘तुतारी’ फुंकणारा हा शेतकरी आहे. म्हणजे मावळा आहे. योग्य वेळी योग्य चिन्ह मिळाले. दादांच्या गटाला पूर्वीचे ‘घड्याळ’ हे चिन्ह गेले हे बरे झाले. निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह दादांना दिले. पण, घड्याळ्याची चावी पवारसाहेबांच्या खिशात राहिली. त्यामुळे ते चिन्ह मिळाल्यापासून १०.१० च्या पुढे ते घड्याळ सरकलेच नव्हते. त्यामुळे बंद पडलेले घड्याळ निवडणूक आयोगाने दादांना देवून टाकले. आता ते घड्याळ चालो न चालो… समजा चालले, तरी त्याचा गजर किती मोठा होणार? झाला तरी तुतारीच्या आवाजापुढे तो गजर ऐकू येणारच नाही. त्यामुळे सर्वच अर्थाने ‘तुतारी’ हे चिन्ह फारच लाभदायक ठरणार.

‘निवडणूक आयोग पक्षपाती आहे.’ वैगेरे आरोप रोज होत आहेत. जाहीरपणे होत आहेत… सर्वोच्च न्यायालयामुळे लोकशाही शिल्लक राहिली आहे, असेही देशात चित्र आहे. पण निवडणुक आयोगाला एक शाबासकी दिली पाहिजे… निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनापक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह रद्द केले. ते शिंदे गटाला दिले. आणि उद्धव ठाकरेसाहेबांच्या शिवसेना पक्षाला ‘मशाल’ चिन्ह दिले. माझे व्यक्तिगत मत सांगतो… धनुष्यबाण हे चिन्ह तसे कालबाह्य आहे. पूर्वीच्या काळी युद्धे धनुष्यबाणाने होत होती, त्याला पाच हजार वर्षे झाली. त्यामुळे कालबाह्य चिन्ह आता शिंदे गटाकडे गेलेले आहे. त्यामानाने अंगावर येणारे असे म्हणता येईल हे ‘मशाल’ चिन्ह शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची एकूण राजकीय प्रकृती आणि चारित्र्य, मशाल या चिन्हात परिपूर्णरितीने एक प्रकारे सामावलेले आहे. मशाल म्हणजे मेणबत्ती नव्हे. ‘मशाल’ या शब्दातच एक धाक, दरारा आणि तेज आहे. नेमकीच तीच अवस्था ‘तुतारी’ या निशाणीची आहे. कोणत्याही मंगल समारंभात तुतारीवाला असल्याशिवाय मजा नाही. त्याची ती शिवाजी महाराजांच्या काळातील पगडी… लाल पट्टा, पांढरा अंगरखा, तानाजी, येसाजी असा एखादा लढवय्या मावळा समोर यावा, असे ते तुतारीवाले अनेक कार्यक्रमांत दिसतात.. आणि त्यांच्या तुतारीतून निनादलेला तो आवाज गगन भेदून टाकतो. शिवसेनेकडे ‘मशाल’ आणि पवारसाहेबांकडे ‘तुतारी’ दोन्ही व्यक्ति तमत्त्वांकडे बरोबर शोभणारी चिन्हे मिळालेली आहेत. त्यामुळेच म्हटले, जे होते ते चांगल्याकरिता होते…

आता राहिला तो काँग्रेसचे चिन्ह ‘हात’… जेव्हा इंदिरा गांधींच्या पक्षाचे चिन्ह गोठवले गेले… तेव्हा इंदिरा काँग्रेस पक्षातही थोडी चिंता निर्माण झाली होती. पूर्वी पहिल्या निवडणुकीत म्हणजे १९५२ काँग्रेसची निशाणी ‘मानेवर जू असलेली बैलजोडी’ होती. पंडित नेहरू यांनी १९५२, १९५७, १९६२ या निवडणुका याच चिन्हावर जिंकल्या. १९६७ नंतर चिन्हांचे वाद सुरू झाले. इंदिरा गांधींना ‘गाय-वासरू’ चिन्ह मिळाले. त्या चिन्हावरही काँग्रेसने यश मिळवले. पुन्हा जेव्हा काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली तेव्हा हे चिन्ह गोठवण्यात आले. आता नवीन चिन्ह कोणते? निवडणूक आयोगाने सुचविले की, ‘अपक्ष सदस्यांसाठी जी चिन्हे आहेत त्यातील एक चिन्ह निवडा…’ अपक्ष सदस्यांकरिता किती गंमतशीर चिन्हे होती… त्यात शिटी होती.. पाण्याचा बंब होता… धान्य दळायचे जातं होते… त्रिदल (तीन पाने) होते… पाण्याची बादली आणि एका कोपऱ्यात बिचारा ‘हाताचा पंजा’ पडून होता… कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. इंदिरा गांधी यांनी वसंत साठे यांना चिन्ह शोधून आणायला पाठवले… इंदिराजी त्यांना ‘वसंत’ नावाने असे हाक मारत असत. आम्ही सगळे त्यांना ‘बापू’ म्हणायचो… त्यावरही विनोद व्हायचा… कारण महात्मा गांधी यांना ‘बापू’ म्हटले जायचे.. महात्माजींचा आश्रम वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामला… आणि वसंत साठे हे ‘बापू’ वर्धा जिल्ह्याचे खासदार… त्यामुळे काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंत साठे यांची आम्ही काही मित्र गंमत करायचो… हे बापू आणि ते ‘बापू…’

–तर अशा या ‘बापू’ साठे यांनी कोपऱ्यात पडलेला हात पाहिला… आणि अपक्षांना दिले जाणारे हे चिन्ह इंदिराजींना सुचविले. इंदिराजींनाही सुरुवातीला ते खटकत होते. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, नेता कोणत्याही पक्षाचा असो…. त्या पक्षाचे चिन्ह कोणतेही असो… सभेला व्यासपीठावर पोहोचल्यानंतर त्या-त्या पक्षाचे नेते समोरच्या श्रोत्यांना हाताचा पंजा उंचावूनच अभिवादन करतात… अगदी वाजपेयींपासून कोणीही… एका क्षणात ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह काँग्रेसने स्वीकारले आणि त्या हाताच्या पंजाने काय चमत्कार केला… हे देशाने पाहिले. आज काँग्रेस थोडी अडचणीत असली तरी ‘हात’ हे प्रभावी चिन्ह काँग्रेसजवळ आहे. आता पवारसाहेबांकडे ‘तुतारी’ आहे. उद्धवसाहेबांकडे ‘मशाल’ आहे… तिन्ही प्रभावी चिन्हे आहेत. राजकीय वातावरणातही ‘चिन्ह’ बदलल्याचे जाणवत आहे. त्यामुळे वातावरण चांगले आहे. देशभरात अनेक मार्गांनी भाजपाने हवा तयार करण्याचा प्रयत्न केला असला तरी महाराष्ट्र त्या हवेवर यावेळी मतदान करेल, असे अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रातील ‘हवा’ वेगळीच आहे. वारा वाहतोच आहे, असे नाही. आपण मध्ये-मध्ये म्हणतो… वातावरण एकदम कोंदट आहे… हवेत गारवाही नाही… आणि धड पाऊसही पडत नाही… थोडीशी घुसमट होत असते… पण अशा वातावरणातच मनाची एक बैठक तयार होते. महाराष्ट्र आज त्या अवस्थेत आहे. त्यामुळे आता नेत्यांची कसोटी आहे. पवारसाहेब ४० वर्षांचे तरुण होऊन महाराष्ट्रभर फिरत आहेत. परवा कोल्हापूरला शाहूमहाराजांकडे होते… तिकडे भंडाऱ्यापर्यंत असतात. उद्धवसाहेबांच्या सभेला तर तुडुंब गर्दी आहे. ही गर्दी आणलेली नाही… आपणहून येणारी आहे. बाकी पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्या की, खुर्च्या ओस पडल्याचे फोटो प्रसिद्ध होत आहेत. जे काही चालले आहे ते लोकांना पसंत नाही. हे अगदी निश्चित. त्यामुळे आघाडीला मिळालेल्या या नवीन चिन्हांचा एक मोठा फायदा असा होणार आहे की, वादाचा विषय संपला… तुतारीच्या आवाजापुढे घड्याळाचा आवाजही ऐकू येणे कठीण… ‘मशाल’ तर धगधगतीच आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता आहे. तसे म्हटले तर महाराष्ट्र काँग्रेसला आज तगडा नेता नाही. नाना पटोले त्यांच्या परिने फिरत आहेत. पण, सभा घुसळून काढणारा, नेता, वक्ता आज तरी काँग्रेसजवळ नाही. शिवाय नवीन कोऱ्या करकरीत चेहऱ्याच्या उमेदवारांची नावे आणि त्यांची तयारी लगेच सुरू केली पाहिजे. लोकांना आता जुने चेहरे नको आहेत. भले पराभूत झाले तरी चालतील… पण नवीन चेहरे द्या… तरुण चेहरे द्या… काय परिणाम होतो पहा… ज्याच्याविरोधात बोलायला काहीच नाही, असा चेहरा दिला तर अर्धी लढाई जिंकता येईल.

आणखी एक महत्त्वाचे राजकीय पाऊल उचलावे लागेल… पवारसाहेबांनी, उद्धवसाहेबांनी आणि स्वत: खरगेसाहेब अशा तिघांनी एकत्र पुढाकार घेवून, वंचित आघाडीला आपल्यासोबत आणले पाहिजे. त्यांना जागाही सोडल्या पाहिजेत. आणि सन्मानाने सोबत घेतले पाहिजे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी पडलेल्या उमेदवारांना सगळ्यात मोठा फटका, वंचित आघाडीच्या उमेदवाराने मते घेतल्याने झाल्यामुळे बसलेला आहे. अगदी ढळढळीत उदाहरण म्हणजे… सुशीलकुमार शिंदे… खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सुशीलकुमारांच्या विरोधात १,७०,०७ एवढी मते घेतल्यामुळे सुशीलकुमारांचा पराभव १,५८,६०० झाला. त्यांनी तो हसत-हसत पचवला… ते आजही काँग्रेससोबत ठाम आहेत. भाजपाने दिलेली सत्तेची ‘ऑफर’ त्यांनी ठामपणे धुडकावून लावली. ‘काँग्रेसने मला काय कमी दिलेय’? असा प्रश्न विचारला… गृहमंत्रीपद मिळाले… लोकसभेचा नेता म्हणून माझी नियुक्ती झाली. कारण पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग लोकसभेचे सदस्य नव्हते. ते राज्यसभेचे सदस्य होते. म्हणून सभागृहाच्या नेतेपदी सुशीलकुमार यांची नेमणूक झाली, असे पहिल्यांदाच घडले. सुशीलकुमार याबद्दल मनस्वी कृतज्ञ आहेत. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही काँग्रेस सोडून राज्यसभेच्या एका पदासाठी माजी मुख्यमंत्री गेले… आणि दुसरा माजी मुख्यमंत्री भाजपाची ऑफर ठोकरून लावतो… निश्चितपणे अजून नितीमूल्याच्या राजकारणाची चाड असलेले नेते देशात आहेत. त्यामुळे वाहिन्यावाल्यांनी कसाही प्रचार केला तरी, सामान्य माणूस गेल्या चार-पाच वर्षात सगळ्यात राजकीयदृष्ट्या हुशार झालेला आहे. त्यामुळे ‘चिन्ह’ बदलल्याने निवडणुकीतील निकालाचा परिणाम बदलेल, अशी स्थिती आता राहिलेली नाही.

काहीवेळा जे होते ते चांगल्याकरिता होते… असे जे बोलले जाते… ते किती खरे आहे, त्याची प्रचितीच निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे धगधगती ‘मशाल’ आणि निनादणारी ‘तुतारी’, उंचावलेला ‘हात’ सगळेच काही जमून आलेले आहे. आता या संधीचे सोने करण्याची जबाबदारी नेत्यांवर आणि कार्यर्त्यांवर आहे. आपसात भांडू नका… मुलीला-मुलाला तिकीट मागू नका… उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि स. पा. चे जागावाटप समजुतदारपणे होऊ शकते. सगळ्याच कठीण राज्य तेच होते. दिल्ली-पंजाबमध्ये ‘आप’शी काँग्रेसचे जागावाटप विचारपूर्वक होऊ शकते… महाराष्ट्र तर पुरोगामी आहे ना! आता पदाचा लोभ ठेवू नका… मंत्री खूप झाले… खूप होतील… सत्ता अनेकांनी भोगल्या… पुढेही भोगतील… आजचा विषय ‘कोणाला सत्ता मिळणार’ हा अजिबात नाही. ‘कोणाला सत्तेवरून दूर करायचे’ आहे, हा विषय आहे. त्याचे उत्तर मिळाले की, नंतर सत्ता मिळणारच आहे. तेव्हा पहिला उद्देश समजून घ्या… थोडा राजकीय शहाणपणा दाखवलात तर सर्वकाही सुरळीत होईल. ‘तुतारी’ निनादणार आहेच… ‘मशाल’ धगधगणार आहे. ‘हाता’चा कचका काय असतो, हेही दिसणार आहे. आता ‘तीन तिघाडा काम बिघाडा’असे न होऊ देता, ‘वंचित आघाडी’ हा चौथा सहकारी सोबत घ्या. मग तुताऱ्या कशा वाजतात ते बघा… मशाली कशा धगधगताहेत आणि हाताचा प्रभाव किती आहे, सगळ्यांचा हिशेब तिघांमध्ये न करता चौघांमध्ये करा. मग जमलच म्हणून समजा… सध्या एवढेच…

– मधुकर भावे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!