Just another WordPress site

Kapaleshwar Temple : काय सांगता! भारतातील कपालेश्वर मंदिरात भगवान महादेवासमोर नंदीच नाही

प्रभू शिव शंकरावर श्रद्धा असणारे भाविक केवळ भारतातच नाहीत, तर परदेशातही आहेत. देशभरातील शिवमंदिरांमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य असते. ती म्हणजे शिवमंदिरातील नंदी. नंदी हे शिवाचे वाहन मानले जाते. नंदीशिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कुणी केली नसेल. मंदिर छोटे असो वा मोठे असो, शिवपिंडीसमोर नंदी विराजमान असतोच. मात्र, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक शिवमंदिर आहे, ज्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही. ते म्हणजे नाशिक शहरातील  कपालेश्वर महादेव मंदिर.



प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला मोठा इतिहास आहे. नाशिक शहर म्हटलं, की, डोळ्यांसमोर उभे राहातो तो म्हणजे दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा. नाशिकचा पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे.  अन् या गोदाघाटलगत अनेक देव-देवतांची मंदिरे आहेत. त्यात महादेवाचे कपालेश्वर मंदिरही आहे. मात्र, .या मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदीच नाही. शंकरासमोर नंदी नसलेले हे एकमेव मंदिर असावे, अशी मान्यता आहे. नंदी नसल्याची आख्यायिका पुराणात आढळते. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव आणि महेश यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत, तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. महादेवाला ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना.  आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच, नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय,  त्यामुळे तुला माझ्यापुढे बसण्याची गरज नाही, तू गुरुसमान आहेस, असे शंकराने नंदीस सांगितले. त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही, अशी  आख्यायिक सांगितली जाते. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील महादेव मंदिरात गेलात, तर शंकराच्या पिंडीजवळ तुम्हाला नंदी विराजमान दिसेलच. नंदी हा महादेवांच वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडीसमोरचं स्थान असतं. मात्र, नाशिकचे ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर मात्र, याला अपवाद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!