Just another WordPress site

IPS Navneet Sekera : कोण आहेत सुपर कॉप नवनीत सिकेरा ज्यांच्यावर आधारित आहे ‘भौकाल’ वेब सिरीज?

कधी कळत-नकळतपणे पोलीसदेखील सामान्य माणसाशी गरजेहून अधिक कठोर वागतात. असाच काहीसा अनुभव एका तरुणाला आला, आणि त्यानंतर जे झालं, ते फारच आश्चर्यकारक होतं. नुकतीच त्या तरुणावरील ‘भौकाल’ या वेबसीरीजचा दुसरा सिजन रिलीज झालाय. या वेब सीरिजमध्ये मोहित रैनाने ज्यांची भूमिका साकारली, त्या आयपीएस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट नवनीत सेकेरा यांच्या रंजक प्रवासाविषयी जाणून घेऊया.हायलाईट्स

१. नवनीत सिकेरा पहिल्याच प्रयत्नात आयपीएस 

२. सिकेरा उत्तर प्रदेश केडरचे १९९६ च्या बॅचचे IPS

३. इंग्रजी येत नसल्याने नाकारला होता सिकेरांचा प्रवेश 

४. सिकेरा यांनी आतापर्यंत ५६ गन्हेगारांना घातले कंठस्नान


नवनीत सेकेरा हे उत्तर प्रदेश केडरचे १९९६ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्या ते उत्तर प्रदेश पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. १९७१ साली त्यांचा जन्म एटा जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. ते सामान्य शेतकरी कुटुंबात वाढले. शिक्षणाची इच्छा होती मात्र, परिस्थिती नसल्यानं  ते एका छोट्या हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकले, मात्र, त्यांचा कल नेहमीच अभ्यासाकडे होता.  काही तरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात होती. बारावीनंतर त्यांनी दिल्लीमधील हंसराज कॉलेजात पुढील शिक्षण घेण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यांना इंग्रजी येत नाही, असं कारण देत त्यांना ऍडमिशन फॉर्मच देण्याचं नाकारलं गेलं.  मात्र या अपमानाने खचून न जाता त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच अभ्यास करून त्यांनी आयआयटीची परीक्षा पास केली. आयआयटी रुरकीमध्ये ऍडमिशन घेऊन त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र, अभियांत्रिकीनंतर असे काही घडले, ज्यामुळे त्यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित नोकरीत जाण्याची प्रेरणा मिळाली. तर त्याचं झालं असं की, नवनीत यांच्या वडिलांनी एक जमीन खरेदी केली होती, जी काही गुंडांनी बळकावली होती. अभियांत्रिकी करून नवनीत घरी आले होते, म्हणून त्यांनी वडिलांना पोलिस ठाण्यात नेले. त्यांनी आपली अडचण अधिकाऱ्याला सांगितली, मात्र पोलीस अधिकाऱ्याने मदत करण्याऐवजी शिवीगाळ सुरू केली. तुम्ही आमच्याशी असे वागू शकत नाही, असे त्यांचे वडील म्हणाले. हा माझा मुलगा आहे, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्यावर पोलिस अधिकारी म्हणाला, असे अभियंते खूप फिरतात. या घटनेने सेकेरा अस्वस्थ झाले. त्यांना पोलिसाने गैरवर्तन अजिबात आवडले नाही. त्यावेळी ते काहीही करू शकले नाहीत. मात्र, त्यांनी पोलिस खात्यातच जाण्याचा निर्णय पक्का केला. एमटेक करण्याचा विचार सोडून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. त्यांनी एवढी मेहनत घेतली की, कोणत्याही कोचिंग शिवाय पहिल्या प्रयत्नातच लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. आणि पहिल्याच प्रयत्नात ते एसीपी बनले. दोन वर्षांतच मेरठमध्ये एएसपीच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. सेकेरा यांची सुरुवातीची पोस्टिंग इतर अनेक ठिकाणी झाली. मात्र, जेव्हा ते मुझफ्फरनगरला आले, त्यावेळी हे शहर गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध होते. दोन-तीन टोळ्यांनी मिळून लोकांचे जगणे कठीण केले होतं. अपहरण, अत्याचार, खून असे गुन्हे सर्रास घडत होते. सेकेरा यांनी एक टीम तयार करून  गुन्हेगारी आणि गुन्हेगार दोन्ही संपवायला सुरुवात केली. इथूनच सेकेरा यांचा सुपर कॉप बनण्याचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी  त्यांनी ४० हून अधिक एन्काउंटर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मेरठमध्ये झाली. तेथेही  त्यांनी  गुन्हेगारांवर कारवाई सुरूच ठेवली. ते लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. नंतर त्यांची बदली लखनौला झाली. इथंही त्यांच्या गुन्हेगारांच्या अटकेची आणि एन्काऊंटर्सची मालिका सुरूच राहिली.  तुम्हाला नाना पाटेकरचा अब तक छप्पन सिनेमा आठवतोय? नवनीत सेकेरा हे अब तक छप्पन पोलिस अधिकारी आहेत. उत्तर प्रदेशात गुंडगिरी आणि एकूण गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीला चांगला चाप बसवला असून आतापर्यंत ५६ गन्हेगारांना कंठस्नान घातले. एक यशस्वी आयपीएस अधिकारी म्हणून ते परिचित आहेत. कोणतेही यश गाठण्यासाठी तुम्हाला ठराविक शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भाषेची गरज नसते, हेच नवनीत यांनी येथे सिद्ध करून दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!