Just another WordPress site

दिवाळीपूर्वी महागाईचा फटका, अमूलनंतर गोकूळचेही दूध महागले; आता ‘एवढ्या’ रुपयांची झाली वाढ

कोल्हापूर : मागच्या काही दिवसांपूर्वी अमूलने दुधाच्या विक्री दरात वाढ करून ग्राहकांना दणका दिला होता. दरम्यान आता गोकुळनेही दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या या निर्णयाने ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर गोकुळने म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ३ रुपये तर खरेदी दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय काल(दि. १७ ) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

तसेच गोकुळने गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. गायीच्या दूध विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी माध्यमांना दिली.

मागच्या सव्वा वर्षांत गोकुळने तब्बल ६ वेळा दुधाच्या विक्री दरात वाढ केली आहे. दरम्यान खरेदी दरात वाढ केल्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी चांगली बाब आहे. हे नवीन दर अंमलबजावणी २१ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

जागतिक पातळीवर दूध पावडरची मागणी आणि किमती वाढल्यामुळे गोकुळने दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या गोकुळचे जिल्ह्यातील दूध संकलन १३ लाख १५ हजार ४१० लिटर आहे. विक्री १५ लाखापेक्षा अधिक आहे. त्यामुळे कमी पडणारे दूध बाहेरून खरेदी करावे लागत आहे. दूध खरेदी दरात वाढ करून गोकुळने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिवाळीची भेट दिली आहे. गायीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, मात्र विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एसएनएफ प्रतिलिटर ४५ रुपये ५० पैसे होता. तो आता ४७ रुपये ५० करण्यात आला आहे. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतिलिटर ३२ रुपये होता, तो आता ३५ रुपये राहील. युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे दूध पावडरला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोकुळकडे ११ हजार टन दूध पावडरची मागणी आहे. परंतु गोकुळ ही मागणी पूर्ण करू शकत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

 

अमूल डेअरीचाही दणका

अमूल डेअरीने सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढवले आहेत. अमूलने शनिवारी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. यासह फुल क्रीम दुधाचा दर ६१ रुपयांवरून आता ६३ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडू शकते. आधीच देशातील किरकोळ महागाईचा दर सात टक्क्यांच्या वर आहे. नवीन दरवाढ आजपासून लागू झाली आहेत. यापूर्वी १७ ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!