Just another WordPress site

Indian Army Day 2022: १५ जानेवारी हा दिवस ‘सैन्य दिन’ म्हणून का साजरा केला जातो?

१५ जानेवारी हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे….  हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारतीय लष्कर  ७४ वा सैन्य दिवस साजरा करत आहे. हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. मात्र, भारतीय लष्कर दिन हा १५ जानेवारीलाच का साजरा केला जातो? या दिवसाचा नेमका इतिहास काय? ज्यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो, ते फील्ड मार्शल केएम करिअप्पा कोण आहेत?  याच विषयी जाणून घेऊ.


हायलाईट्स

१. दरवर्षी देशात १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो

२. केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ आर्मी डे होतो साजरा 

३. १८९५ ला झाली होती भारतीय सैन्याची अधिकृत स्थापना 

४. १५ जानेवारीला देशभरात केले जाते परेडचं आयोजन

कधी झाली भारतीय लष्कराचा स्थापना? 

भारतीय लष्कराची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने १७७६ साली कोलकाता येथे केली होती. त्यावेळी भारतीय लष्कर ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी होती, ज्याला नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नाव मिळाले. मात्र, १  एप्रिल १८९५ ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. भारतीय लष्कराची जगातील प्रमुख बलाढ्य लष्करांमध्ये गणना होते. भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. संख्येच्या दृष्टीनं भारताकडे जगातील दुसरं सर्वात मोठं लष्कर आहे. भारतीय लष्करातील जवानांची संख्या जवळपास १४ लाख आहे.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा? 

सन १८९९ साली कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात करियप्पा यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ 20 व्या वर्षी त्यांनी लष्करात नोकरी सुरु केली. जनरल करियप्पा यांनी १९४७ सालच्या भारत पाकिस्तान युध्दावेळी देशाच्या पश्चिम सीमेवर लष्कराचे नेतृत्व केलं होतं. देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्करावर ब्रिटिश सेनापतीचा ताबा होता. १९४७  मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे नेतृत्व ब्रिटिश वंशाच्या व्यक्तीकडे होते. १९४९ मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते. विशेष म्हणजे त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले.


आर्मी डे १५ जानेवारीलाच का साजरा केला जातो

आर्मी डे १५ जानेवारीला साजरा करण्याची दोन मुख्य कारणं आहेत. १  एप्रिल १८९५ ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती.  तर दुसरं कारण म्हणजे, ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर हे ब्रिटिश भारताचे शेवटचे लष्कर प्रमुख होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ त्यांनीच भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व केलं. नंतर याच दिवशी म्हणजे, १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल  केएम करिअप्पा यांना भारतीय लष्काराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषत करण्यात आलं होते. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. 


करिअप्पा यांचे कर्तृत्व काय ? 

१९४७ च्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तान विरोधातील युद्धात लेफ्टनंट जनरल करियप्पा यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं. निवृत्तीनंतर त्यांना  १४ जानेवारी १९८६ मध्ये फील्ड मार्शल पद देण्यात आले. याशिवाय दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये जपान्यांना पराभूत केल्याबद्दल त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरचा सन्मानही मिळाला होता.

देशभरात केले जाते परेडचं आयोजन

करियप्पा असे पहिले भारतीय अधिकारी होते ज्यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं. सैन्य दिनानिमित्त भारतीय लष्कराचे साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचं स्मरण केलं जातं. या दिवशी देशातील सर्व कमांड मुख्यालयासह नवी दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस साजरा केला जातो.  या दिवशी सैन्याचे परेड कार्यक्रम, प्रदर्शन आणि इतर महत्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. हे कार्यक्रम सैन्यदलाच्या दिल्ली येथील मुख्यालयासोबतच इतर मुख्यालयातही साजरे करण्यात येतात. सैन्य दिनानिमित्त ज्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते.


सैन्यावरील खास गीत होणार प्रदर्शित

महत्वाची बाब म्हणडे भारतीय लष्करावर आज एक खास गीत प्रदर्शित केलं जाणार आहे. ‘माटी’ असं या गीताचं शिर्षक असेल. गायक हरिहरन यांनी हे गीत गायलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!