Just another WordPress site

कॉंग्रेस अध्‍यक्षपदी निवड झालेल्या मल्‍लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष हा प्रवास कसा झाला?

कॉंग्रेस अध्‍यक्षपदी मल्‍लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली आहे. त्‍यांनी शशी थरुर यांचा पराभव केला. गांधी घराण्‍याचे एकनिष्‍ठ आाणि विश्‍वासू सहकारी असणार्‍या मल्‍लिकार्जुन खर्गे यांचा राजकीय प्रवास जाणून घेवूया.

मल्‍लिकार्जुन खर्गे यांचा जन्‍म १९४२ मध्‍ये कर्नाटकमधील बिदर जिल्‍ह्यात झाला. त्‍यांचे शिक्षण गुलबर्गा येथे झाले. पदवीनंतर त्‍यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. यानंतर त्‍यांनी काही काळ वकिली व्‍यवसायही केला. महाविद्‍यालयीन जीवनातच त्‍यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. १९६९ मध्‍ये त्‍यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर अवघ्‍या तीन वर्षात म्‍हणजे १९७२ मध्‍ये ते गुरमितकल मतदारसंघातून आमदार झाले. यानंतर सलग दहा वेळा आमदार होण्‍याचा विक्रम त्‍यांनी केला. कर्नाटक काँग्रेसमधील दलित नेते अशीही त्‍यांची ओळख असली तरी सर्व समुदायांबरोबर निष्‍पक्ष संवाद साधणारा नेता अशीही त्‍यांची जनमानसावर छाप आहे. त्‍यांनी कनार्टकमध्‍ये ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री महसूल मंत्री, उद्योग मंत्रीपद भूषवले. १९९४ मध्‍ये ते कनार्टक विधानसभा विरोधी पक्षनेते झाले. सलग सातव्‍यांदा आणि आठव्‍यांदा विधानसभा निवडणूक जिंकल्‍यानंतर मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत खर्गे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र या पदाने नेहमीच त्‍यांना हुलकावणी दिली. २००५ ते २००८ या काळात त्‍यांनी कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.

मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी २००९ मध्‍ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. २००९ मध्‍ये ते केंद्रात कामगार आणि रोजगार मंत्री झाले. १७ जून २०१३ ते १६ मे २०१४ या कालावधीत त्‍यांनी केंद्रीय रेल्‍वे मंत्रीपदाची धुरा संभाळली होती. २०१४च्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. यावेळी लोकसभेत खर्गे यांना पक्षाने गटनेता म्‍हणून निवडले.

२०१९ लोकसभा निवडणकीत खर्गे यांचा पराभव झाला. यानंतर काँग्रेसने राज्‍यसभेवर त्‍यांची वर्णी लावली. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्‍यांची राज्‍यसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. काँग्रेस अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठी त्‍यांनी विरोधी पक्षाच्‍या राजीनामा दिला होता. आता खर्गे यांची निवड काँग्रेस अध्‍यक्षपदी झाली आहे. आज काँग्रेस पक्षासमोर अनेक आव्‍हाने आहेत. खर्गे याचा कसा सामना करणार यावरच त्‍यांच्‍या पक्षाध्‍यक्षपदाच्‍या कारकीर्दीचे मूल्‍यमापन होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!