Just another WordPress site

Shivsena : शिवसेनेची स्थापना कशी झाली? बाळासाहेबांनी पक्षाला शिवसेना हेच नाव का दिलं?

Shiv Sena : मराठी आणि हिंदुत्वावर हुंकार काढणारी शिवसेना (Shiv Sena) गेल्या वर्षभरापासून संकटातून जात आहे. गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या इतिहासात कधीही न घडलेल्या अशा घटना घडल्या आहेत. जून 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर राज्यात नवं सरकार आलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन शिवसेनेला मान्यता दिली. एक शिवसेना उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray). ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेंचं नाव आहे बाळासाहेबांची शिवसेना… अशी आज शिवसेनेची दोन शकलं झालेली आहेत. असो, आज 19 जून. शिवसेनेचा स्थापना दिन. त्याच निमित्ताने शिवसेनेची स्थापना कशी झाली? बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) पक्षाला शिवसेना हेच नाव का दिलं? याच विषयी जाणून घेऊ. (How was Shiv Sena founded? Why did Balasaheb name the party Shiv Sena?)

बाळासाहेब ठाकेरंनी सुरूवातील व्यंगचित्रकार म्हणून सर्वप्रथम सामाजिक प्रश्नांवर भाष्य करायला सुरुवात केली. 1950 मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. नंतरच्या काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासोबतही काही काळ काम केले. बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी ऑगस्ट 1960 मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले.

याच साप्ताहिक मार्मिकमध्ये शिवसेनेची बीज रोवली होती, असं म्हणता येईल.  साप्ताहिकाचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना त्यांचे वडिल प्रबोधकार ठाकरेंनी सुचवलं होतं. मार्मिक हे मराठीतील पहिले व्यंग्य साप्ताहिक होते. ‘मार्मिक’चा पहिला अंक तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित झाला. मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याला व्यवस्थेतून डावललं जाणं हे विषय मार्मिकमधून सतत अधोरेखित केले गेले. मार्मिकमधील लेखणीने, मैदानी सभांमधील भाषणांनी आणि व्याख्यानांमुळे मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरेंना भेटत होते. त्यांच्यापुढे व्यथा मांडत होते.

बाळासाहेबांना नेता मानणारे सर्वसामान्य मराठी लोक त्यावेळी मातोश्रीवर गर्दी करत होते. लोकांच्या समस्या समजून घेऊन आवाज उठवायला सुरुवात केली. त्यावेळी बाळासाहेबांचं ‘वाचा आणि शांत बसा’ हे सदर खूचप गाजलं. यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना वारंवार विचारले की, पक्षाबाबत आणि संघटनेबाबत तुमचे काही विचार आहेत का? असे विचारले.  लोक येणार-जाणार असे किती दिवस चालणार? जनतेच्या आवाजाला एकत्रित संघटित रूप कधी देणार? असे प्रश्न विचारले.

‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच मुंबईत अपमानित होतो आहे.’ हा विचार घेऊनच बाळासाहेबांनी 1966 या मार्मिकच्या अंकात तरुणांची संघटना स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

जाहीर केले खरे पण त्याला नाव काय द्यायचे हा विचार सुरू असतानाच प्रबोधनकारांनी एक नाव सुचवले. प्रबोधनकार ब्राह्मण चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेली आदराची भावना अनुभवली होती.त्यामुळेच त्यांनी स्वतःहून नाव सुचवलं शिवसेना. शिवसेना म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची सेना.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ लागली. लोकांचा प्रतिसाद बघून ते सुखावले आणि त्यांनी19 जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली.  बाळासाहेबांनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी केवळ अठरा लोक हजर होते.

या सोहळ्याला ठाकरे कुटुंबीयातील चौघे स्वतः बाळ ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू व प्रबोधनकार ठाकरे हजर होते. यावेळी नाईक नावाच्या एका कार्यकर्त्यांनी शेजारच्या किराणा मालाच्या दुकानातून नारळ आणला. सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकारांच्या हस्ते नारळ फोडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली.

मार्मिकमधून केलेल्या अवाहनाला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. मराठी लोकांनी या ‘संघटना’ म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली.  मार्मिक कचेरीवर झालेल्या तुडुंब गर्दीत 2000 तक्ते तासाभरात संपले आणि महिन्यात वीस हजार सैनिकांची नोंदणी झाली.

शिवसेना आता 57 वर्षाची झाली आहे. या काळात शिवसेनेने मराठी माणसासाठी दिलेला लढा सर्वांनी पाहिला आहे. या गेल्या साडेपाच दशकात शिवसेनेने प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज लहान मुलांच्या तोंडातही शिवसेना हे नाव आपसुकच येतं. सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा एका शिवसैनिकाच्याच हातात आहे. ही सुखद गोष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!