Just another WordPress site

Difference Between CID and CBI | सीबीआय आणि सीआयडी यामध्ये काय फरक आहे ?

प्रत्येक देशामध्ये अपराधी शोधण्यासाठी अनेक मोठमोठ्या एजन्सी असतात. आपल्या देशामध्ये सुद्धा अशा अनेक एजन्सी आहेत. तुम्ही कधी सीआयडी ही मालिका पाहात असेल तर  CID कशा प्रकारे काम करते हे तुम्हाला चांगलंच माहित असेल. याच सीआयडीच्या रडारवर सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह आहेत. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर अनिल देशमुख तपास यंत्रणांच्या रडारवर आले. ते तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. वारंवार समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे अनिल देशमुखांच्या नावानं लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली. त्यामुळे सीबीआय आणि सीआयडी यात नेमका फरक काय?  CBI हा विभाग नेमका आहे तरी काय? या विभागाचे काम कोणते? याच विषयी जाणून घेऊया.

CBI म्हणजे काय?

प्रत्येक देशाची एक केंद्रीय चौकशी एजन्सी असते. त्याच प्रमाणं सीबीआय हा भारताचा केंद्रीय अन्वेषण विभाग आहे, जो भारत आणि विदेशातील होणारे अपराध, हत्या, घोटाळे आणि भ्रष्टाचार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये आणि राष्ट्रीय हिताच्या संबंधित अपराधांमध्ये भारत सरकारकडून चौकशी करतो. सीबीआयचे मुख्यालय मुख्यालय दिल्लीला आहे. राज्य सरकारच्या विनंतीवर राज्यातील प्रकरणांचीही चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते. म्हणूनच सुशांत सिंग राजपूतची केस सुप्रीम कोर्टाने CBI ला दिली.


केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशभरात कुठेही घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करु शकते. सीबीआयची स्थापना भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सहा वर्षे आधी म्हणजेच 1941 मध्ये झाली होती. आणि त्यानंतर 1963 मध्ये सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्यूरो हे नाव देण्यात आलं. भारत सरकार राज्य सरकारच्या संमतीने कोणत्याही अपराधी गुन्ह्याची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआय कडे देते. आणि उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारच्या सहमती शिवाय सीबीआय ला चौकशी करण्याचे आदेश देऊ शकते. सीबीआय संचालकांची नियुक्ती लोकपाल कायद्यानुसार पंतप्रधान, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नियुक्त केलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष नेते यांची समिती करते.


CID म्हणजे काय?


सीआयडी म्हणजेच क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट. सीआयडी हा राज्यातील पोलिसांचा तपास आणि गुप्तचर विभाग असून ही एक अशी एजन्सी आहे जी, राज्य सरकारच्या अखत्यारितील गुन्ह्यांचा तपास करते. ब्रिटिश सरकारने 1902 मध्ये पोलिस आयोगाच्या शिफारशीनुसार CID ची स्थापना केली होती. संपूर्ण राज्य हे सीआयडीचे कार्यक्षेत्र आहे. CID चे प्राथमिक काम गंभीर गुन्हे, दंगली, खोटेपणा तपास करणं हे आहे.  फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागात चौकशीचा अधिकार सीआयडीला असतो. प्रत्येक राज्याची एक वेगळी सीआयडी तपास एजन्सी असते, त्यांचे कार्य करण्याचे अधिकार राज्य सरकार किंवा राज्याच्या उच्च न्यायालयाकडे असतात. म्हणजेच राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय राज्यातील कोणतेही गुन्हेगारी प्रकरण सोडविण्याची जबाबदारी सीआयडीकडे सोपवते. पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील  कोणतीही  दंगल, हत्या यांसारख्या प्रकरणांची चौकशी सीआयडी करते.  राज्य सरकार किंवा हायकोर्ट सीआयडीला चौकशीचा आदेश देऊ शकतं. सीआयडीचे प्रमुख हे अतिरिक्त संचालक पदाचे पोलीस अधिकारी असतात.


CBI आणि CID मध्ये काय फरक ?

१. सीआयडीचे काम करण्याचे क्षेत्र फक्त एका राज्यापुरते मर्यादित असते. 

तर  सीबीआयचे काम करण्याचे क्षेत्र पूर्ण भारत आणि विदेशामध्ये असते.  

२. सीआयडीला राज्य सरकार आदेश देत असते, तर सीबीआयला केंद्र सरकार आदेश देत असते.  

३. सीआयडी राज्य सरकारच्या आधीन राहून कार्य करते, तर सीबीआय केंद्र सरकारच्या आधीन राहून कार्य करते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!