Just another WordPress site

Dead Sea : काय सांगता! जगात असाही एक समुद्र आहे, ज्यात माणूस ठरवूनही बुडू शकत नाही; नेमकं कारण काय?

समुद्राच्या पाण्याशी खेळ करु नका, असं अनेकदा सांगितलं जातं. मुळात पाण्याशी खेळ नको हाच त्यामागचा हेतू. खरंतर जगातील कानाकोपऱ्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या वेगळेपणामुळे जगप्रसिद्ध आहेत. अशा गोष्टी आपल्याला ऐकल्या तर आपण बुचकळ्यात पडतो.  तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की,  जगाच्या पाठीवर असा एक असा समुद्रही आहे जिथं कोणी अपघातानेही बुडत नाही, अगदी ठरवलं तरी. हो, हे खरंय. त्यामुळे पोहता न येणारा माणूसदेखील या समुद्रात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो.  या समुद्राचं नाव आहे, Dead Sea अर्थात मृत समु्द्र. याच विषयी जाणून घेऊ.

समुद्रात किंवा नदीमध्ये अंघोळ करत असताना आपण पाण्यात बुडायची भीती मनाच्या एका कोपऱ्यात घर करून असते. यापुर्वी समुद्रात बुडालेल्यांच्या बातम्या तुम्ही पेपरात वाचल्या असतील. मात्र, मृत समुद्र हा असा एक समुद्र आहे ज्यामध्ये कोणी ठरवून देखील बुडू शकत नाही. या समुद्राचं नाव थोडं विचित्र वाटतं. पण या समुद्रात कोणतीही वनस्पती उगवू शकत नाही, की कोणताही जीव टिकू शकत नाही. याचं मुख्य कारण आहे ते या समुद्राच्या पाण्यात अति प्रमाणात असलेले क्षार. त्यामुळे या समुद्रात मासे किंवा इतर प्राणी नसतात. म्हणूनच याला डेड सी अर्थात मृत समुद्र म्हणतात.  मृत समुद्र हा जगातील सर्वांत छोटा आणि कमी क्षेत्रफळावर पसरलेला समुद्र आहे.  सुमारे ३ लाख वर्षं जुना असलेला हा समुद्र आशियाच्या  नैर्ऋत्य भागात इस्रायल आणि जॉर्डन यांच्या दरम्यान आहे.  हा समुद्र ६५ किलोमीटर लांब आणि १८ किलोमीटर रुंद आहे. हा समुद्र १ हजार ३७५ फूट खोल आहे.  जगातला सर्वांत खोल खाऱ्या पाण्याचा तलाव म्हणून हा समुद्र ओळखला जातो.  मृत समुद्राला पृथ्वीचा सर्वांत खालचा बिंदू मानले जाते.  शास्रज्ञांच्या मते तृतीयक कालखंडातील पृथ्वीच्या हालचालींमुळे या समुद्राची निर्मिती झाली असावी, हे याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंस असलेल्या डोंगर रांगांच्या तीव्र कड्यांच्या अभ्यासावरून दिसून येते. या समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यानं यातले पाण्याचे प्रवाह खालून वरच्या दिशेनं असतात. त्यामुळे या समद्रात कोणीही बुडत नाही. दुसरं म्हणजे,  या समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर अगदी जमिनीप्रमाणे आडवं झोपताही येतं. त्यामुळे इथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.  या समुद्राच्या पाण्यात पोटॅश, ब्रोमाइड, झिंक, सल्फर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखी खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे यातून काढलेलं मीठ आहारात वापरता येत नाही. अति खारटपणासाठीही मृत समुद्र जगभरात प्रसिद्ध आहे. इतर समुद्रांपेक्षा या समुद्राचं पाणी ३३ टक्के जास्त क्षारयुक्त आहे. त्यामुळे या समुद्राच्या पाण्यात आंघोळ केल्यानं बरेच रोग दूर होतात. या समुद्रातली मातीदेखील गुणकारी आहे. यातली चिकणमाती अनेक सौंदर्यप्रसाधनं तयार करण्यासाठी वापरली जाते.  हा समुद्र चहूबाजूंनी जमिनीनं वेढलेला असून, जॉर्डन  ही एकमेव नदी याला येऊन मिळते. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या समुद्राच्या पाण्याची पातळी समुद्रसपाटीपेक्षा १३०० फूट खोल होती; मात्र जॉर्डन नदीचं पाणी व्यावसायिक वापरासाठी वळवण्यात आल्यानं या मृत समुद्राची पातळी घटून २०१० च्या सुमारास समुद्रसपाटीपेक्षा १ हजार ४१० फूट खाली गेली.  या समुद्राची पातळी दर वर्षी तीन फुटांनी घसरत असल्याचं आढळलं. याशिवाय मिनरल इंडस्ट्री सुद्धा यातील पाण्याचा बऱ्याच प्रमाणात वापर करते. हे असेच चालू राहिले तर या समुद्रातील पाणी वारंवार उपसले जाऊन एक दिवस या सागराचे अस्तित्वच संपण्याची भीती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!