Just another WordPress site

Clock : काय सांगता! ‘या’ शहरातील घड्याळात वाजत नाहीत १२, कारण ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल

माणूस असो वा घड्याळ बारा वाजणार नाही म्हणाल तर कुणालाही आश्चर्य वाटेल. कधीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी घटना घडते की,  ज्यामुळं माणसाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसतात. पण घड्याळाचे तर बाराशी जन्मोजन्मीचं नातं आहे. जगातील प्रत्येक घड्याळात १२ वाजतात. प्रत्येक घड्याळात बाराचा आकडा असतो. पण तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की,  जगाच्या पाठीवर असं एक शहर आहे,  की त्या शहरातील घड्याळात कधी १२ वाजत नाहीत. याच शहरतील घड्याळाविषयी जाणून घेऊ.

स्विर्त्झलंडमधील सोलोथर्न शहरात असं घड्याळ आहे,  ज्यामध्ये बारा वाजतच नाहीत. त्यामागील कारण समजल्यावर तुम्हीदेखील आश्चर्यचकीत व्हाल. सोलथर्न शहरातील टाऊन स्क्वेअरच्या मनोऱ्यावर लावण्यात आलेल्या या घड्याळात फक्त ११ पर्यंतचे आकडे आहेत. त्यातून १२ हा आकडा गायब आहे. यासारखीच अनेक घड्याळे या शहरात आहेत,  ज्यामध्ये बारा वाजत नाहीत. या शहाराचे एक खास  वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्ये म्हणजे, इथल्या लोकांना ११ हा आकडा फार आवडतो. इथल्या अनेक वस्तूंचे डिझाईन हे ११ च्या आकड्याप्रमाणं दिसतात. इथली प्रत्येक गोष्ट ११ नंबरशी जोडली गेलीये. या शहरात  ११ संग्रहालये, ११ बुरुज आणि ११ ऐतिहासिक धबधबे आहेत. शहरातील मुख्य चर्च सेंट उरुसमध्येही ११ क्रमांक आहे. हे चर्च तयार करण्यास ११ वर्षे लागली, असं सांगतात. एवढेच नाही तर या चर्चमध्ये ११ दरवाजे, ११ खिडक्या अन् ११ घंटी बसवण्यात आल्यात. ११ अंकाची क्रेझ इतकी आहे की ११ तारखेला या शहराचा वाढदिवसही साजरा केला जातो. इतकेच नाही तर लोकांना देण्यात आलेल्या भेटवस्तूही कुठेतरी ११ आकड्यांशीच संबंधित असतात. हे आजच्या दिवसापासून नाही, तर शतकानुशतकांपासून या शहरातील लोकांचं  ११ अंकावर प्रेम आहे. ११ क्रमांकाला एवढे महत्त्व असण्यामागे प्राचीन काळापासूनच्या परंपरा आहेत. असं सांगितलं जातं की, सोलोथर्नचे लोक खूप कष्ट करायचे. मात्र कष्ट करूनही त्यांच्या जीवनात समाधान नसायचे. काही वर्षांनी डोंगराळ प्रदेशातून एल्फ म्हणजे, देवदूत येऊ लागले आणि लोकांचा उत्साह वाढवू लागले. देवदूत आल्यानंतर तिथल्या लोकांना आनंद आणि समाधान मिळू लागले. या देवदूतांविषयी जर्मनातील प्राचीन गोष्टींमध्ये वाचायला मिळते. असं सांगितल्या जाते की, त्या देवदूतांकडे अलौकिक शक्ती होती आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ होतो ११.  तेव्हापासून इथल्या लोकांनी ११ क्रमांकाला महत्त्व द्यायला सुरुवात केली. ज्यामुळे इथं प्रत्येक ठिकाणी ११ क्रमांकाशी काहीतरी संबंधित आहे. घड्याळातसुद्धा, केवळ ११ अंक दिसतात. त्यामुळं या शहरातील घड्याळांमध्ये १२ कधीच वाजत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!