Just another WordPress site

नेजल व्हॅक्सिनला केंद्र सरकारची मंजुरी, कोणाला घेता येणार ही लस? कुठे करावी नोंदणी?

चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोविड-१९ च्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये. चीनमध्ये या व्हेरियंटने मोठा हाहाकार निर्माण केला. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागल्या. भारतात देखील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट बीएफ.७ व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळं केंद्र सरकारने इंट्रानेजल व्हॅक्सिनला म्हणजेच नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी परवानगी दिलीये. दरम्यान, नाकावाटे दिली जाणारी लस कशी काम करते? आणि ती कुठे मिळणार? याच विषयी जाणून घेऊ.

दोन वर्षांनी कोरोनातून नुकताचं कुठं सुटकेचा श्वास मिळाला असतांना आता काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंड हातपाय पसरू लागला. भारतातही कोरोनाच्या सर्वात जास्त धोकादायक असलेल्या व्हेरियंट BF.7 चे रुग्ण आढळले. BF.7 चे व्हर्जन सर्वात आधी चीनमध्ये पाहायला मिळाले.

किती धोकादायक आहे BF.7 व्हेरियंट?

BF.7 हा Omicron च्या BA.5 व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. या सब-व्हेरियंटची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे अशा लोकांना देखील या व्हेरियंटची लागण होऊ शकते. एका अहवालानुसार, BF.7 प्रकार श्वसन प्रणालीच्या वरच्या भागाला संक्रमित करतो. त्यामुळे ताप, खोकला, घसादुखी, नाक वाहणं, अशक्तपणा, थकवा यांसारखी लक्षणं दिसतात. लागण झालेल्या काही व्यक्तींमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणं देखील जाणवतात. महत्वाचं म्हणजे, BF.7 ची लागण झालेली एक व्यक्ती १०-१८ लोकांना संक्रमित करू शकते.

दरम्यान, भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्न आढळ्यानंतर आता भारत सतर्क झाला. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या व्हेरिएंटला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना राबवतेय. यातच आता देशासाठी आणखी एक महत्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आलीये. कोरोनाच्या लढ्यात मोठे अस्त्र ठरणाऱ्या लशीबाबतही केंद्राने मोठा निर्णय घेतला. कोरोना संदर्भातील आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने पौढांसाठी नाकावाटे देणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी देत बुस्टर डोस म्हणून नेझल करोना लशीची शिफारस केली होती. अखेर जगातील पहिल्या नाकावाटे घेण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशीला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिलीये. ही लस भारत बायोटेक इंटरनॅशनल या कंपनीने तयार केली असून ‘एनकोव्हॅक’ असं या लशीचं नाव आहे. चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ.७ व्हेरियंटने धुमाकुळ घातला असताना अशा परिस्थितीत ही लस या व्हेरिएंटविरुद्ध लढ्यात अतिशय महत्त्वाची मानली जातेय.

नेजल लस कुठे उपलब्ध होणार?

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितलं की, तज्ज्ञांच्या समितीनं नेजल व्हॅक्सिनच्या वापराला मंजुरी दिली. कोविन अॅपवर आजपासून भारत बायोटेकच्या एनकोव्हॅक या लशीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला खासगी रुग्णालयांतच ही लस उपलब्ध होणार आहे. सरकार लवकरच ही लस सरकारी रुग्णालये आणि बाजारात उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. या लशीला मंजुरी मिळाल्याने डोस घेण्यासाठी कुणालाही इंजेक्शन टोचून घेण्याची आवश्यकता नाही.

कसा आणि कोणाला घेता येईल हा डोस?

१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी बुस्टर डोस म्हणून नाकावाटे दिली जाणारी ही लस देता येणार आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींना ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे.

काय आहेत फायदे?

भारत बायोटेकच्या मते नेजल लसीचे अनेक फायदे आहेत. त्यातील पहिला फायदा म्हणजे, ही नॉन-इन्व्हेंसिव्ह आणि सुई-मुक्त लस आहे. त्यामुळं नागरिकांना लसीकरणानंतर होणार वेदना टाळता येणार आहेत. दुसरं म्हणजे, नाकावाटे घेण्याच्या या लशीमुळे नाकाच्या वरील भागात प्रतिजैविके तयार होतात. आणि त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखणे व रोगाची बाधा टाळणे शक्य होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!