Just another WordPress site

कॅबिनेट मंत्र्यांनी लिहिलं ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल सुबोध भावेला पत्र, म्हणाले, “मानधन स्वत:साठी खर्च…”

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक पटांची लाटच आली आहे. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. इतर ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

अभिनेता सुबोध भावेने चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा अनुभवता आला. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल सुबोध भावेला पत्र लिहीत त्याचं कौतुक केलं आहे. झी स्टुडिओ मराठीने त्यांच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केलं आहे.

प्रिय,

श्री सुबोधजी भावे,

सप्रेम वंदेमातरम!

झी स्टुडीओ निर्मित हर हर महादेव या चित्रपटात आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी मिळणारे मानधन स्वत:साठी खर्च न करता ते शिवरायांनी ज्यांच्यासाठी स्वराज्य निर्मिले त्या उपेक्षित वंचितांसाठी खर्च करण्याचा जो संकल्प केला तो मनाला भिडला. मुळात ही भूमिका करायला मिळणे हेच मानधन असल्याची उदात्त भावना आपण व्यक्त केली. आपल्या विविध भूमिकांमधील अष्टपैलूत्व महाराष्ट्राने अनुभवले आहेच. मात्र आपल्या या संकल्पातून सामाजिक जाणीव जपणारा संवेदनशील मनाचा माणूस आम्ही अनुभवला. आपल्या विषयीचा आदर द्विगुणीत झाला.

आपल्या या कृतीला, संकल्पाला माझा मानाचा मुजरा. आपल्यासारखे जेष्ठ व श्रेष्ठ अभिनेते मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीची शान आहेत. आपल्या उत्तरोत्तर यशासाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

‘हर हर महादेव’ चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्न्ड या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!