Just another WordPress site

Budhddev Bhattachary : कोण आहेत पद्म पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य आणि संध्या मुखर्जी?

देशांतील सर्वांत मानाच्या पुरस्कारांपैकी एक असणारे पद्म पुरस्कारांचे मानकरी नुकतेच जाहीर करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची भारत सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आली. यात विविध क्षेत्रांतील मान्यवर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी ठरले. यामध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र आता बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार घेण्यास नकार दिल्यानं या पुरस्कारांविरोधात पहिली ठिणगी पडली. याशिवाय,  संध्या मुखर्जी यांनीही पद्म पुरस्कार नाकारला. दरम्यान, हे पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य  आणि संध्या मुखर्जी आहेत तरी कोण?  याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.हायलाईट्स

१. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झाली पद्म पुरस्कारांची घोषणा

२. पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर वादाची पहिली ठिणगी

३. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा पुरस्कार स्वीकारण्यास नकार

४. संध्या मुखर्जी यांनीही नाकारला पद्मश्री पुरस्कार 

मोदी सरकारने  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्म भूषण आणि संध्या मुखर्जी यांना पद्मश्री हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव कऱण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. पद्म पुरस्कार हे देशातल्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानले जातात. अशात या दोन्ही दिग्गजांनी हे पुरस्कार नाकारल्यानं त्याची देशभरात चर्चा होतेय. पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर  बुद्धदेव यांच्यावतीने लेखी स्वरूपात प्रतिक्रिया जारी करण्यात आलीये.  ‘मला पद्मभूषण पुरस्काराबाबत कोणतीही कल्पना नाही. मला याबाबत काहीच कळवण्यात आलेले नाही. जर मला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असेल तर तो मी स्वीकारणार नाही’, असे बुद्धदेव यांनी नमूद केले आहे.


कोण आहेत बुद्धदेव भट्टाचार्य?

ज्योती बसू यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. २००० ते ते २०११ मध्ये डाव्या पक्षांचा पराभव होईपर्यंत पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री होते. जादवपूर मतदारसंघातून सलग २४ वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. माकपच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक महत्वाचे नेते आहेत. त्यांचा जन्म १ मार्च १९४४ ला कोलकाता या ठिकाणी झाला. त्यांचं वडिलोपार्जित घर हे बांगलादेशात आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बांगला साहित्याचं शिक्षण घेतलं. बांगला ऑनर्समध्ये त्यांनी बीए ही पदवीही घेतली. त्यानंतर १९६६ मध्ये ते सीपीएम म्हणजे कम्युनिस्ट पक्षाशी जोडले गेले. ते माकपाचे युथ डेमिक्रेटिक युथ फेडरेशनचे सचिव म्हणूनही तेव्हा निवडले गेले. १९७७ मध्ये त्यांनी उत्तर कोलकाता येथील कोसीपोरवरून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. ६ नोव्हेंबर २००० ला ज्योती बसु यांच्याऐवजी बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. बंगालमध्ये औद्योगिकीकरणाची सुरूवात करणारे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. टाटाच्या नॅनो प्लांटला सिंगूरमध्ये त्यांनी संमती दिली होती. पुढे २०११ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी डाव्यांचा सुपडा साफ केला. त्यामुळे ३४ वर्षे डाव्यांकडे असलेली सत्ता तृणमूलच्या हाती गेली. बुद्धदेव भट्टाचार्य यांचाही त्या निवडणुकीत पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारांशी समरस झालेले ते अखेरचे मुख्यमंत्री ठरले. बुद्धदेव भट्टाचार्य हे सीपीआयएमचे पोलिट ब्युरोचे सदस्य राहिले आहेत. आतापर्यंत सीपीएम आणि सीपीआयच्या कुठल्याही नेत्याने अशा प्रकारचा पुरस्कार स्वीकारलेला नाही. माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनाही भारतरत्न सन्मान देण्याची चर्चा झाली होती. मात्र त्यांनीही त्याला नकार दिला होता. 


कोण आहेत संध्या मुखर्जी?

संध्या मुखर्जी यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ ला कलकत्ता  या ठिकाणी झाला. त्यांचे वडील रेल्वे अधिकारी होते. संध्या त्यांच्या सहा बहीण-भावांपैकी सर्वात लहान आहेत. पंडित संतोष कुमार बसू, प्रोफेसर एटी कन्नन आणि प्रोफेसर चिन्मय लाहिरी यांच्याकडून त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांचे गुरू उस्ताद बडे गुलाम अली खान होते. उस्ताद गुलाम अली खान यांच्यानंतर त्यांचे पुत्र उस्ताद मुनव्वर अली खान त्यांचे गुरू झाले, ज्यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीतात प्रभुत्व मिळवलं. पुढं त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात हिंदी सिनेमांमधल्या गाण्यांतून केली होती. १९५० मध्ये आलेल्या तराना या सिनेमात त्यांनी गाणी म्हटली होती. १९५२ मध्ये काही खासगी कारणामुळे त्या कोलकाता या ठिकाणी परतल्या. १९६६ मध्ये त्यांनी बंगाली कवी श्यामल गुप्ता यांच्याशी लग्न केलं. संध्या मुखर्जी या ६० आणि ७० च्या दशकातल्या सर्वात यशस्वी आणि मधुर आवाजाच्या गायिका होता. त्यांनी आतापर्यंत हजारो बंगाली गाणी म्हटली आहेत. संध्या आणि हेमंत मुखर्जी यांच्या गाण्यांची आठवण आजही लोकांच्या मनात कायम आहे. २०११ मध्ये संध्या मुखर्जी यांना पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला बंग विभूषण हा पुरस्कार मिळाला. जय जयंती नावाच्या एका बंगाली सिनेमासाठी त्यांना १९७० मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!