Just another WordPress site

Budget 2022: पंतप्रधानपदी विराजमान असतांना कोणत्या पंतप्रधानांना सादर करावा लागला होता अर्थसंकल्प?

साधारणत: दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात. यंदाही तेच होणार आहे. भारत सरकारकडून दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. खरंतर अर्थसंकल्प संसदेत सादर करणं ही अर्थमंत्र्यांची जबाबदारी असते.  मात्र, देशाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांना अर्थसंकल्प सादर करावा लागला. पाहूया, कोणकोणत्या पंतप्रधानांना सादर करावा लागला होता अर्थसंकल्प?


हायलाईट्स

१. अर्थसंकल्प संसदेत सादर करणं ही अर्थमंत्र्यांची जबाबदारी 

२. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प जाहीर करणार 

३. पंतप्रधान नेहरूंनी पंतप्रधान असताना सादर केला अर्थसंकल्प 

४. इंदिरा गांधींनी १९७०-७१ सालचा अर्थसंकल्प सादर केला होता


नेहरुंनी सादर केला होता अर्थसंकल्प

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे  पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी १९५८ मध्ये अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांच्या अकाली राजीनाम्यामुळे पंतप्रधान नेहरूंनी अर्थसंकल्प सादर केला. वास्तविक, टीटी कृष्णमाचारी  हे नेहरू सरकारमध्ये अर्थमंत्री होते. मुंद्रा घोटाळ्यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे खुद्द नेहरूंनी संसदेत अर्थसंकल्प मांडला होता.


इंदिरा गांधींनी केला होता अर्थसंकल्प सादर 

जवाहरलाल नेहरूंनंतर इंदिरा गांधी या देशाच्या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला. खरे तर इंदिरा सरकारमधील अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर इंदिरा गांधीनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी १९७०-७१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मोरारजी देसाई हे त्यावेळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळत होते. जुलै १९६९ मध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्याकडून अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेतली आणि त्यांना उपपंतप्रधानपद स्वीकारण्यास सांगितले. त्यावर मोरारजी देसाई यांनी तत्कालीन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या मुद्द्यावरून मोरारजी देसाई यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.


राजीव गांधींनी १९८७ साली केला होता अर्थसंकल्प 

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनी १९८७ मध्ये पंतप्रधान म्हणून अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन अर्थमंत्री व्हीपी सिंह सरकारमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना अर्थमंत्रिपद स्वीकारले आणि १९८७-८८ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर केले.  या तिघांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्प सादर केला नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!