Just another WordPress site

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ आधी ‘या’ यात्रांनी देशाचं अख्ख राजकारण बदलवलं होतं

सध्या सोशल मीडिया ओपन केला आणि त्यावर स्क्रोल केलं तर तुम्हाला एक माणसाचे फोटो पहायला मिळतात, ते म्हणजे राहुल गांधींचे. त्यांच कारण म्हणजे कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. या यात्रेत राजकीय पक्षासह इतर सामाजिक कार्येकर्तेही सहभागी झालेत. राहुल गांधींनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’ आपल्या देशातली पहिलीच यात्रा नाही. यापूर्वी देखील अनेक दिग्गज नेत्यांनी पदयात्रा काढलेल्या आहेत आणि त्या यात्रांनी देशाचं राजकरण बदलून टाकलं आहे. आता त्या यात्रा कोणत्या आहेत आणि त्या यात्रांनी भारताच्या राजकारणावर काय परिणाम केला? याच विषयी जाणून घेऊ.

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’

कन्याकुमारीपासून निघालेल्या ‘भारत जोडो यात्रेने ६० दिवसांपेक्षा जास्त प्रवास केलाय. आत्तापर्यत यात्रेने दिड हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापले आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून प्रवास करीत ३ हजार ५०० किमी अंतर पार करणार आहे. ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यातून १४ दिवस प्रवास करीत ३८४ किलोमीटरचं अंतर कापणार आहे.

महात्मा गांधींची दांडी यात्रा

स्वातंत्रपूर्व काळात १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधीनी दांडी यात्रा काढली होती. ब्रिटीश राजवटीत भारतीयांना मीठ बनवण्याचा अधिकार नव्हता आणि इंग्लंडमधून येणाऱ्या मिठावर जास्त कर असल्याने भारतीयांना जास्त पैसे मोजावे लागत होते. ब्रिटिशांचा ‘मिठाचा कायदा मोडणे’ हा दांडी यात्रेचा मुख्य उद्देश होता. ७८ सत्याग्रहींपासून सुरू झालेल्या दांडीयात्रेत लाखो सत्याग्रहीं सहभागी झाले. २५ दिवस चाललेल्या दांडी यात्रेने ब्रिटिश राजवटीला धक्का बसला.

स्वातंत्र्यानंतरची चंद्रशेखरांची भारत यात्रा

जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांनी १९८३ साली कन्याकुमारी ते दिल्ली अशी ‘भारत यात्रा’ काढली होती. या भारत यात्राने सुमारे सहा महिन्यांचा करीत चार हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले होते. यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यात्रेच्या समारोप सभेला गर्दी होऊ नये म्हणून त्या काळतील ब्लॉकबस्टर ‘बॉबी’ चित्रपट दूरदर्शनवर दाखवला होता. पुढे यात्रेचा परिणाम असा झाला कि १९९१ मध्ये चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान बनले.

लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा

१९८० च्या दशकात विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिर आंदोलनासाठी वातावरण तयार केले जात होते. त्याला देशभर प्रतिसाद मिळत होता. त्याचा अंदाज घेऊन भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमी आंदोलनाला समर्थन दिले. अयोध्या आंदोलनाच्या प्रसारासाठी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे देशाच्या राजकारणाचा सारा पोत बदलला. देशामध्ये हिंदुत्वाचे वारे निर्माण झाले. अडवाणी यांची यात्रा बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडविली व अडवाणी यांना अटक केली होती. त्यातून देशाच्या विविध भागांमध्ये हिंसाचार उसळला होता. अडवाणी यांच्या अटकेनंतर भाजपने व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळले होते. या रथयात्रेचा भाजपला राजकीय लाभ मिळाला आणि त्यानंतर भाजप सत्तेत आली.

आंध्रमधील रेड्डी पितापुत्राची यात्रा

चंद्राबाबू नायडू सरकार हैदराबाद आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी जास्त निधी देते आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप करीत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी राज्यभर पदयात्रा काढली होती. या पद यात्रेने चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात जनमत तयार झाले आणि राजशेखर रेड्डींचे काँग्रेस सरकार सत्तेत आले. या यात्रेवर आधारित ‘यात्रा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. २०१९ साली वाय. एस. आर. यांचे पुत्र जनगमोहन रेड्डी यांनी पदयात्रा काढली होती. त्या यात्रेनंतर जगनमोहन रेड्डींना दोन तृतीयांश बहुमत मिळाले होते.

शरद पवारांची शेतकरी दिंडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपल्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या आंदोलनांपैकी १९८० मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन नागपूर विधानभवनावर ‘शेतकरी दिंडी’ काढली होती. शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केल्यांनतर शेतकऱ्याच्या प्रश्नांवर जळगाव ते नागपूर अशी पायी पदयात्रा काढली होती. या शेतकरी दिंडीची सुरुवात जळगावमधील नूतन मराठा हायस्कुल येथून केली होती. तर शेवट नागपूर विधानभवनावर केला होता. त्यावेळी या दिंडीमुळे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर शरद पवारांची राजकीय कारकीर्द अधिकच बहरली. कालांतराने त्यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रिपदही मिळाले.

गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९४ मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली होती. गोपीनाथ मुंडेंच्या शिवनेरी ते शिवतीर्थ संघर्ष यात्रेमुळं महाराष्ट्राचं राजकराण तापलं होतं. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. तोपर्यंत राज्यात भाजपाची एकदाही सत्ता आली नव्हती, संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस सरकारची सत्ता गेली आणि १९९५ मध्ये भाजप-सेना युतीचे सरकार आले.

 

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. बिहारमध्ये प्रशांत किशोर देखील आपली यात्रा सुरु करणार आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा देशाच्या राजकारणावर काय परिणाम करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!