Just another WordPress site

नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्या बनवून 27 जणांनी मिळवल्या परदेशात नोकऱ्या

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) बोगस पदव्या (Bogus Degrees) बनवून तब्बल 27 विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकरी मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण, बोगस पदवी देऊन नोकरी मिळवणाऱ्यांवर इराकच्या दूतावासाला संशय आला. त्यानंतर इराकी दूतावासाने या पदव्यांची सत्यता पडताळणीसाठी विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयांशी संपर्क देखील साधला. (27 people got post jobs by making fake degrees of Nagpur University)

मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात इराकच्या दुतावासातर्फे साकोलीतील बापूराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, वर्धा येथील बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि नागपूरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या आणि इराकमध्ये काम करणाऱ्या 27 जणांची माहिती आणि कागदपत्रे या महाविद्यालयांकडून मागविण्यात आली होती. या सर्व पदव्या खऱ्या आहेत का, अशी विचारणा या संस्थांना करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर या विद्यार्थ्यांनी या तिन्ही महाविद्यालयातून अजिबात शिक्षण घेतले नसल्याचे आढळून आले. या लोकांच्या मार्कशीटच नव्हे तर पदव्या देखील बोगस होत्या. दरम्यान, विद्यापीठाने यासंदर्भात केंद्र सरकारचा शिक्षण विभाग, परराष्ट्र मंत्रालय, गृह विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवले आहे. विद्यापीठाने अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, विद्यापीठ एक-दोन दिवसांत पोलिसांकडे रितसर तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच इराकी दूतावासही या विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत द्यायलाही निधी नाही; ६ महिन्यात ११२ आत्महत्या, त्यातील ४७ पात्र, मदत मात्र एकालाच 

विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची बनावट स्वाक्षरी
परदेशात काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाच्या लोगोसह कुलपतींच्या बनावट स्वाक्षरीचाही वापर केला. या 27 पदव्यांपैकी 24 फार्मसी, 2 अभियांत्रिकी आणि एक मायक्रोबायोलॉजीमधल्या पदव्या आहेत. या सर्व पदव्या 2017, 2019 आणि 2020 मधील आहेत.

इराकी अधिकारी विद्यापीठात दाखल
इराकी दूतावासाचे समन्वयक अब्दुल हमीद स्वत: विद्यापीठात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आले होते. इराकी दूतावासाच्या समन्वयकांना या प्रकरणातील सत्यता समजल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. अधिकाऱ्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी इराकच्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत. या कार्यालयात सादर करण्यात आलेल्या पदव्या व प्रमाणपत्रे बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात संबंधित महाविद्यालयाला पत्र पाठवून त्यानंतर विद्यापीठाकडून माहिती घेण्यात आली.

ते विद्यार्थी इराकचे आहेत, नागपूर विद्यापीठातून पदवी का?
बनावट पदवी घेऊन नोकरी मिळवलेले सर्व २६ विद्यार्थी इराकमधील आहेत. इराकी दूतावास त्याची सखोल चौकशी करत आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ते भारतात अभ्यासासाठी आले होते. या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठ का निवडले? नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्या विदर्भ किंवा देशाच्या इतर भागाद बनवल्या जातात का? या दृष्टीनेही इराकी दूतावास चौकशी करत आहे. दरवर्षी हजारो तरुण रोजगारासाठी आखाती देशांमध्ये जातात. विदर्भातील अनेक तरुणही नोकरीसाठी जातात. या कनेक्शनमुळेही नागपूर विद्यापीठाची निवड करून बोगस पदव्या बनवण्यात आल्या असल्याचा संशय वर्तवला जात आहे. ह्या पदव्या कुण्या एकाच व्यक्तीने तयार केली असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!