Just another WordPress site

मद्यपी बापाकडून १ वर्षीय मुलाची दगडावर आपटून हत्या, कोर्टाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा

नागपूर : मुलगा नाही मुलगी हवी होती असे म्हणत एक वर्षाच्या पोटच्या पोराला दगडावरून आपटून ठार मारणाऱ्या नराधमाला सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. भजन मेहताब कवरेती असे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर आपला १ वर्षीय मुलगा सत्यम याच्या हत्येचा आरोप होता.
ही हत्येची घटना २५ मे २०२१ रोजी रात्री ९च्या सुमारास खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भजन याला दारुचे व्यसन होते. त्याने आपली पत्नी मथुराला दारुसाठी पैसे मागितले. तिने नकार दिल्याने तो रागावला. आणि रागाच्या भरात तो पत्नी मथुराला मारहाण करू लागला. अशात त्याची नजर त्याच्या एक वर्षाच्या मुलाकडे गेली. मला मुलगा नाही मुलगी पाहिजे होती, असं म्हणत त्यानं आपल्या एक वर्षांच्या सत्यमला हातात घेतले. त्याचे पाय धरून त्याने त्याला दगडावर आदळले. यात सत्यमचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी भजन कवरेती याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. तपासाअंती त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, प्रकरण कोर्टात गेल्यावर अतिरिक्त सरकारी वकील आसावरी परसोडकर यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला दोषी ठरवित त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!