Just another WordPress site

महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

हाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत  राज्यात मोठी चर्चा पाहायला मिळाली.  राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधत लॉकडाउनची घोषणा केलीय.


राज्यात १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू!

उद्या बुधवारी (१४ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून २५ दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे. नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.


लोकल, बससेवा सुरू राहतील

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.

हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त होम डिलीव्हरी, टेक अवे सेवा 

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.


एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.


शिवभोजन थाळी मोफत

राज्यात शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली होती आता शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे. लॉकडाऊननंतर रोजीरोटीचं काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचं नुकसान होईल, पण रोटीची सोय आपण केली आहे.


निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे 35 लाख लाभार्थ्यांना 2 महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.


बांधकाम कामगारांना अनुदान

महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य देत आहोत.


घरेलू कामगारांसाठी भरीव तरतूद

याशिवाय राज्यातील 25 लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.


फेरीवाले यांना १५०० रुपये मदत

अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी १५०० रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या ५ लाख आहे.


रिक्षा चालकांना अर्थसहाय्य

१२ लाख परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये एकवेळचे आपण देत आहोत. 


आदिवासी बांधवाना २ हजार रुपये

आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे २ हजार रुपये देत आहोत.


कोविडवरील सुविधा उभारणी

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे 3 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.


सरकारी संस्थांना कर भरण्यास मुदतवाढ

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

यावेळी मुख्यमंत्री जनतेला संबोधून म्हणाले, नाईलाजाने ही बंधनं टाकावी लागत आहेत. आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधनं आपल्याला स्वीकारावी लागत आहेत. ही बंधनं मी एकतर्फी टाकलेली नाहीत. त्यामाग फक्त प्राण वाचावेत हाच हेतू आहे. हे अजिबात आनंददायी नाही. टीका करणारे कितीही असले, तरी त्याला न भुलता आपली जी बांधिलकी आहे, त्याला स्मरून हे निर्बंध तुमच्यावर लादत आहे. त्याचा न रागावता स्वीकार करा आणि कोविडला पराभूत करण्यासाठी कंबर कसून सहकार्य करा. तरच, आपल्याला या साथीवर नियंत्रण मिळवता येईल.




Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!