Just another WordPress site

ताजमहाल, राष्ट्रपती भवन आणि संसदभवन सुध्दा विकणारा भारताच्या इतिहासातला चालाख महाठग

तुम्हाला विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्याविषयी ठाऊक असेल. यांनी देशातील बॅंकांना लाखों रूपयांचा चुना लावून विदेशात धूम ठोकलीय.  मात्र, ठगेगिरीत यांचाही उस्ताद असणाऱ्या नटवरलाल याच्या विषयी तुम्हाला काही माहितीये का? या महाठगाची कारनामे ऐकून तुम्ही त्याला दंडवतंच घालाल. नटवरलालची गोष्ट तुम्हाला एखाद्या चित्रपटाचं कथाकन वाटेल.  पण, खरोखऱ भारताच्या इतिहासात नटवरलाल नावाची एक वल्ली होऊन गेलीय ; ज्याने चक्क तीन वेळा आग्र्याचा ताजमहाल, दोनवेळा लाल किल्ला आणि एकदा तर राष्ट्रपतीभवन सुध्दा विकलं होतं ! या महाठगाचं नाव आहे नटवरलाल उर्फ मिथिलेश कुमार श्रीवास्तव. मिथिलेश कुमार हा नाव बदलण्यात एकदम पटाईत होता. नटवरलाल हे त्याचं बारा नावापैकी एक नाव आहे.


हाईलाईट्स- 


१. नटवरलालंच खरं नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव

२. तो कोणत्याही व्यक्तीची हुबेहुब सही करत असे  

३. मिथीलेशने वकीलीचे शिक्षण घेतलं होतं

४. त्याने ८ राज्यांच्या पोलिसांची झोप उडवली होती


 कोण होता नटवरलाल?


मिथीलेश कुमार श्रीवास्तव हा मुळ बिहारच्या सीवान जिल्ह्यातील जीरादेई गावातला.  असं म्हणतात की, मिथीलेश यांनं वकीलीचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळं त्याला थोडीफार इंग्रजी येत  होती. त्यानं काही काळ पटवारीची नोकरी सुध्दा केली होती. पण त्याचं मन वकीलीत आणि नोकरीत रमलं नाही.  हेराफेरी, ठगेगिरी यातच त्याला जास्त इंटरेस्ट होता.  त्याने आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ठकवण्याचे कारनामे केले.  नटवरलालला एक कला अवगत होती.  ती म्हणजे तो कोणत्याही व्यक्तीची हुबेहुब सही करू शकत होता.  

एकदा नटवरलाल यांच्या गावात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आले होते. तिथे नटवरलाल याने आपल्या या कलेचा नमुना लोकांसमोर ठेवण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या समोर त्यांची हुबेहुब स्वाक्षरी करून उपस्थितांना बुचकाळ्यात पाडलं. आपल्या याच कलेचा फायदा घेत नटवरलालने पहिला गंडा घातला तो आपल्या शेजाऱ्याला.  त्याने शेजाऱ्याच्या चेकवर खोटी सही करून  १००० रूपये काढले आणि चालू झाला त्याच्या ठगेगिरीचा प्रवास.


नटवरलालचे कोणते कारनामे प्रसिद्ध ? 




नटवरलाल याचे ताजमहाल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन विकण्याचे किस्से सर्वात जास्त प्रसिध्द आहेत. त्याने तीन वेळा ताजमहाल, दोनदा लाल किल्ला, एकदा तर चक्क राष्ट्रपती भवन आणि त्यांच्या ५४५ सदस्यांसोबत संसद भवनही विकून टाकलं होते. असं म्हणतात की, नटवरलालने राष्ट्रपतींच्या बनावट सहीने या वस्तूंची विक्री केली होती. नटवरलाल याने केवळ सरकारलाच नाही तर कित्येक बड्या उद्योगपतीना जसं टाटा बिरला, धीरूभाई अंबानी यांना गंडवलं होतं. नटवरलालवर उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये फसवणूकीच्या शंभरहून अधिक तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्याच्या कारनाम्यांमुळे  ८ राज्यांच्या पोलिस व प्रशासनाची झोप उडाली होती.  पोलिसांनी मिथिलेशवर बक्षीससुध्दा लावले होते.


नऊ वेळा पकडूनही फक्त ११ वर्ष राहिला तुरुंगात

आपल्या जीवनकाळात नटवरलाल ९  वेळा पकडला गेला आणि केवळ ११ वर्ष तुरूंगात राहिला. मात्र, वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याला ११३ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर, फसवणुकीच्या तीस गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा मिळू शकली नाही.  तो  कित्येकदा जेलमधून पळून जाण्यात यशश्वी झाला.  पोलिसांना तर कित्येकदा गुंगारा दिला. एकदा फसवणुकीच्या एका प्रकरणात त्याला दिल्लीच्या तिहार जेलमधून कानपूरला कोर्टात हजर करण्यात आले होते.  नटवरलाल तेव्हा साधारण ७५ वर्षाचे होते.  दिल्ली बसस्थानकावर खूप गर्दी होती. ते रेल्वेच्या बाकड्यावर बसून धापा टाकत होते. त्यांनी युपी पोलिसांतील जवानाला सांगितले की, माझं शरीर कापतंय. मला बाहेरून औषध आणून देशील का ?  जेव्हा माझे नातेवाईक  मला भेटायला येतील तेव्हा तुला तुझे पैसे परत करेन. त्यांनतर तो जवान औषध आणायला गेला. आता नटवरलाल जवळ दोन पोलिस राहीले होते.  त्यांच्यापैकी एकाला त्याने पाणी आणायला पाठवले.  उरलेल्या हवालदाराला त्याने आपल्याला बाथरूमला जायचे असल्याचे सांगितले. आपल्याला गर्दीतून एकट्याला चालयला त्रास होईल असे सांगून तो त्या हवालदाराला घेऊन गेला. त्याने हवालदाराला धरून त्याच्या बरोबर यायला सांगितले. जेणेकरून लोक त्याला वाट मोकळी करून देतील. त्यानंतर नटवरलाल गर्दीचा  फायदा घेत दोरी सोडून कधी पोबारा केला ते हवालदाराला कळलेच नाही. नटवरलाल फरार झाल्यानंतर तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केलं होतं.


नटवरलालच्या मृत्युचही गुढ गुलदस्त्यात


नटवरलाला जेव्हा जेलमधून फरार झाला तेव्हापासून तो फारसा नजरी पडला नाही. असं म्हणतात, त्याला शेवट बिहारच्या दरभंगा रेल्वे स्थानाकवर पाहीले गेले होतं, जिथे एका पोलिसानं त्याला ओळखलं. पण पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचेतोवर तो फरार झाला होता. असे म्हणतात की, जवळच उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या डब्यात नटवरलालचे कपडे मिळाले. आणि गार्डचा युनिफॉर्म गायब झाला होता. यानंतर २००४ मध्ये नटवरलालचे  पुन्हा एकदा समोर आले तेव्हा त्याचे वकील नंदलाल जैसवाल यांनी सांगितले की, नटवरलालने त्याच्या मृत्यूपत्राची फाईल त्यांना सोपवली होती. काही लोकांचे म्हणणे होते की, त्याच्या मृत्यू २००९ मध्ये झाला, तर त्याचा छोटा भाऊ गंगा प्रसाद श्रीवास्तव याच्या म्हणण्यानुसार नटवरलालचा मृत्यू १९९६ मध्येच झाला. खरे काय ते देवच जाणे !  नटवरलालने त्याच्या मरणालाही गुंगारा दिला होता. त्याच्या अचाट पराक्रमामुळे घोटाळेबाज किंवा महाठग या शब्दाचा समानार्थी शब्द बनलाय नटवरलाल !  पण त्याचा मृत्यू कधी झाला हे एक गुढच आहे. नटवरलालने आपल्या हयातीमध्ये कमाविलेली काही संपत्ती आपल्या गावातील गोरगरिबांना दान केली असल्याने नटवरलालला सिवानचा रॉबिन हूड ही उपाधीही दिली जात असून, त्याच्या आठवणी आजही त्याच्या गावातील लोकांच्या मनामध्ये ताज्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!