Just another WordPress site

जागतिक नृत्य दिन; डान्स करा आणि फिट रहा, डान्स केल्यानं होतात ‘हे’ फायदे

कला ही मानवाला मिळालेली फार मोठी सुखद देणगी आहे. आजवर बरेच कलावंत कलेला समाजाचं प्रतिकात्मक रूप मानतात. तर राष्ट्रसंतांनी कला ही मानवाला भूषण आहे असं सांगितलंय. ६४ कलांपैकी सर्वाना अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसाला आपलीशी वाटणारी कला म्हणजे ‘नृत्य कला’. नृत्य हा जगातल्या प्रत्येकाला मनाचं वैश्विक नातं जोडणारा कलाप्रकार आहे. तसंच तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग देखील आहे.अगदी जागतिक पातळीवर देखील नृत्य दिन साजरा केला जातो. आणि म्हणूनच नृत्य म्हणजे काय? नृत्य दिनाचा इतिहास आणि महत्व काय आहे ? नृत्य केल्यानं काय फायदे होतात? याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.
हाईलाईट्स

१. नोव्हेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नृत्य दिन साजरा केला जातो

२. सन १९८२ सालापासून जागतिक नृत्य दिन होतो साजरा

३. नृत्यातून मनोरंजन, आरोग्य हे दोन्ही हेतू साध्य होतात


जागतिक नृत्य दिनाचा इतिहास काय आहे?

दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. अत्यंत लोकप्रिय मॉडर्न डान्स आणि बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर  यांचा हा जन्मदिवस. 


त्यांची आठवण म्हणून  हा दिवस साजरा केला जावा असं आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्थेनं ठरवलं होत. त्यानंतर या संस्थेच्या आदेशावरून १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी या संघटनेकडून आमंत्रित केलं जातं. 


जागतिक नृत्य दिनाचा उद्देश काय आहे?

जगभरात नृत्यकला साजरी करणं हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा मुख्य उद्देश आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वांना ‘नृत्या’च्या माध्यमातून एकत्र आणणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसंच नृत्यकलेचं समाजातलं स्थान उंचावून नृत्यकलेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करणं हा नृत्य दिनाचा उद्देश आहे. नृत्य कला, नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा अधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागंचा आहे.


भारतातील नृत्याची पार्श्वभूमी काय आहे?

भारतातील नृत्याचा सर्वांत जुना पुरावा उत्तर नवाश्मयुगीन काळातील सिंधू संस्कृतीतून मिळतो. हडप्पातील पुरुष नर्तकाचा पुतळा आणि मोहनजोदड़ो मधील नर्तकीची तांब्याची मूर्ती हे या संस्कृतीतील नृत्य कलेचे दोन पुरावे आहेत. 

भारतात ताम्रपाषाण काळापासून म्हणजे सुमारे पाच सहस्र वर्षांपासून नृत्यमूर्ती उपलब्ध आहेत.  नंतरच्या काळात नृत्य कलेत पारंगत असलेल्यांना राजवाडय़ांत आश्रय दिला जायचा. या कलेचं संगोपन करणं, तिच्या वृद्धीची काळजी घेणं हा राजधर्म समजला जायचा. इतिहासात तुम्ही डोकावून बघितलं तर राज्या-महाराजांकडं खास उत्सवाच्या वेळी नाचगाण्याचे कार्यक्रमही होत होते.  नृत्य आणि मानवी संस्कृती यांचा फार पुरातन संबंध आहे. पुराणात बघितलं तर देवांचा राजा इंद्र यांच्या दरबारातील रंभा-ऊर्वशी या उच्च कोटीच्या नर्तिकी होत्या.भारतातील नृत्यशैली कोणत्या आहेत?

नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली एक कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्यं भारतात प्रचलित आहे. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या असून यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. दक्षिण भारतात शास्त्रीय नृत्याची परंपरा गेली अनेक शतके सुरू असून कुचिपुडी, भरतनाट्यम् कथकली, आणि मोहिनीअट्टम या शैलींचा उगम तेथे झाला आणि तिथेच त्या वाढल्यात.

नृत्य केवळ मनोरंजन नसून, ॲरोबिक व्यायामाचाही तो उत्कृष्ट प्रकार आहे. नृत्यातून मनोरंजन आणि आरोग्य हे दोन्ही हेतू साध्य होतात. त्यामुळं नृत्यांचे फायदे काय आहेत ते पाहूयात.


नृत्याचे काय फायदे आहेत?

१.  बॉलरुम डांन्समुळे पाठीचा खालचा भाग तसंच मांड्यांचा व्यायाम होतो. वाढत्या वजनाची चिंता तुम्हाला सतावत असेल तर तुम्ही डांन्स करायला पाहीजे.

२. फ्लॅमिंको डांन्समधील गेसफुल मुव्हमेण्ट्स तुमचा स्टॅमिना तर वाढवतं शिवाय, तुम्हाला अधिक सजगही बनवतो.

३. टॅप स्टाइलमधील डान्समुळे शरीर मजबूत होऊन शरीराचा समतोल साधणं सुधारतं. शरीराला योग्य ठेवण मिळते.

४. नृत्य केल्यानं श्वसन आणि रक्ताभिसरणाला फायदा होतो.

५. वजन तसंच ताण कमी करण्यास नृत्याची मदत होते.

६. नृत्य केल्यानं रक्तदाबाचा त्रास कमी होऊन कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

७. शरीर आणि पायांना आकार मिळतो. शरीर लवचिक बनतं. स्नायू बळकट होतात

८. नृत्य केल्यानं मन उल्हासित होऊन काम करण्याची कार्यक्षमता वाढते.


जर तुम्हाला आनंदी, उल्हासीत राहायचं असेल तर नृत्य करा.  नृत्य साजरं करायला काळ, वेळ, वय आड येऊ देऊ नका. जस्ट स्टार्ट डान्सिंग अ‍ॅण्ड कीप डान्सिंग!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!